पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मराठी स्त्रीवादी साहित्य


 भारत स्वतंत्र झाल्यावर जी राज्य घटना अस्तित्वात आली, तिने समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, स्वाभिमान ही मूल्ये म्हणून स्वीकारली. शिवाय विकाससूत्र म्हणून एक माणूस - एक मूल्य' तत्त्व मान्य केले. त्याचा परिणाम म्हणून शेकडो वर्षे गुलामीचे जीवन जगणारे समाजातील दलित, वंचित, शेतकरी, स्त्रिया, मजूर यांच्या आकांक्षा उंचावल्या. विषम व्यवस्थेबद्दलचे असमाधान व्यक्त करण्याची परंपरा मराठी साहित्यासाठी काही नवी नव्हती. प्राचीन काव्यात जनाबाई, संत बहिणाबाई (तुकाराम शिष्या) यांच्या अभंगांतूनही ते स्पष्ट होते. महाराष्ट्रात युरोपच्या रेनासांसच्या धर्तीवर प्रबोधन पर्व सुरू झाले ते विविध समाज सुधारणांद्वारे. स्त्रियांच्या गुलामगिरीचा प्रश्न प्रारंभीच्या काळात पुरुष सुधारकांनी मांडला तरी स्त्री जसजशी लिहू लागली. तिने, आपल्या व्यथांना शब्दांतून वाट मोकळी केली. तत्कालीन पुरुषी वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांचं स्वैर व मुक्त लिहिणं शक्य नव्हतं. स्त्रीने प्रारंभी सूचकतेने व नंतर स्पष्टपणे लिहिण्याचे बळ मिळविले. ते मिळवायला ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष (१९७५) उजाडावे लागले.

 राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेला विरोध केला. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांनी स्त्री-पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. विधवांच्या केशवपन प्रथेविरुद्ध टीका केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्त्रीविवाहविरुद्ध अन्याय पद्धतीं (कुमारी-जरठ विवाह) विरुद्ध आवाज उठवला. महात्मा फुले यांनी कुमारीमाता संरक्षण, स्त्रीशिक्षणविषयक आग्रह धरला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवाविवाह, अनाथांचा सांभाळ, स्त्रीशिक्षणविषय पायाभूत कार्य केले. या सर्वांतून स्त्रीमुक्तीस बळ मिळाले.

मराठी वंचित साहित्य/५७