पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘फकिरा' (१९५९) यांनी मराठी ग्रामीण कादंबरी रूढ केली. आनंद यादव यांची ‘गोतावळा' आणि रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा' या दोन्ही कादंबच्या सन १९७१ ला एकाच वेळी प्रकाशित झाल्या. त्यांची यवच्छेदक लेखन शैली असली तरी त्याचा संयुक्त प्रभाव मराठी कादंबरीवर होऊन तिला स्वतंत्र प्रवाहाचे परिमाण लाभले. त्यास या लेखकद्वयांचं लेखनसातत्य जसं कारणीभूत आहे, तसं चळवळ म्हणून उभारलेलं संगठन, समीक्षण कौशल्यही.
 ‘गोतावळा' या आनंद यादव यांच्या कादंबरीनंतर तितक्या उंचीचा टप्पा गाठणारी ग्रामीण कादंबरी मराठीत निर्माण झाली नाही. पण नंतरच्या काळात विश्वास पाटील यांनी 'झाडाझडती' (१९९१) लिहून धरणग्रस्तांच्या टाहोस वाट मोकळी करून दिली. राजन गवस यांनी ‘कळप' (१९९७), ‘तणकट' (१९९८) नव्या ग्रामीण तरुण वर्गाची घुसमट व्यक्त केली. जोडीला सामाजिक संघटनांचा त्यांच्यावरील संस्कार व प्रभावही त्यांनी मोकळेपणाने आपल्या विविध कादंब-यांतून व्यक्त करून ग्रामीण चित्रणास समाजभानाशी जोडलं. देवदासी समाज चित्रण उदाहरण म्हणून सांगता येईल. सदानंद देशमुख यांनी ‘तहान' (१९९८), 'बारोमास' (२००७) कादंब-यांतून पाण्यासाठी महाग आणि म्हणून सदैव कर्जबाजारीने हैराण शेतक-याचं नित्य आत्महत्या करणं चित्रित करून कादंबरीस समकालाशी जोडलं. अप्रत्यक्षपणे जागतिकीकरणाचे परिणाम सूचनही या कादंब-या करतात. चंद्रकुमार नलगे यांचंही विपुल साहित्य नोंद घेण्यासारखं आहे. रंगनाथ पाठारे यांची ‘ताम्रपट' यापूर्वीची बहुचर्चित कादंबरी होय.

 अशोक व्हटकरांच्या ‘मेलेलं पाणी' (१९८२) आणि ‘बहात्तर मैल' (१९८९) सारख्या आत्मचरित्रात्मक कादंबच्या भूक, दैन्य यांचे कल्पनातीत वास्तव उभ्या करतात; तर कृष्णात खोत यांच्या गावठाण' (२००५), 'रौंदाळा' (२००८) आणि ‘झड-झिंबड' (२०१२) आणि ‘धूळमाती' (२०१४) कादंब-यांतून पश्चिम महाराष्ट्रासारख्या जलसमृद्ध प्रदेशातही खेड्यात सारं काही अलबेल नसल्याचा संदेश किंवा पाणी हे वरदान जसं तसं उद्रेक व उद्ध्वस्तपणाचा महापुरी चौमाळही असू शकतो, याचं भान देतात व ग्रामीण प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टीही. पावसाची भिन्न रूपं खोत चित्रित करून एक वेगळी कलात्मकता साधतात. अशोक पवारांची ‘इळनमाळ' (२००३), गणेश आवटेंची ‘भिरूड', रमेश इंगळे-उत्रादकरांची ‘निशाणी डावा अंगठा' (२००५), रवींद्र शोभणेंची ‘पांढर' (२००९), प्रवीण बांदेकरांची चाळेगत (२००९) ग्रामीण वास्तवाची भिन्न परंतु भेदक चित्रं चित्रित करतात. त्यातलं जीवनवास्तव ज्या प्रखरपणे परंतु लीलया हे कादंबरीकार चित्रित करतात.

मराठी वंचित साहित्य/३८