पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आनंद यादव यांनी पश्चिम महाराष्ट्र चित्रित केला. महादेव मोरे, सखा कलाल, चारुता सागर यांचं ग्रामीण चित्रण कलात्मक व लक्ष्यवेधी ठरलं. ‘पेरणी' ते ‘मळणी' असा समग्र ग्रामीण जीवनाचा फेर या कथांतून व्यक्त झाला. जागतिकीकरणाच्या सीमेवर असताना राजन गवस, सदानंद देशमुख, कृष्णात खोत, प्रभृती कथाकार वर्तमानतील बदलतं ग्रामीण जीवन, वाढता राजकीय प्रभाव, शहरीकरणाचं खेड्यास लागलेलं ग्रहण अधिक प्रभावीपणे मांडत आहेत व मराठी ग्रामीण कथा अधिक कलात्मक व आशयाच्या अंगाने उत्कट बनत आहे. त्यांच्या भाषेचा बाज या कथा अधिक प्रभावी करतात.

 मराठी ग्रामीण वा प्रादेशिक कादंबरीलेखनाची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून असली तरी तिला स्वतंत्र ग्रामीण चेहरा मिळाला तो सन १९५० नंतरच्याच काळात. तत्पूर्वी त्याची सुरुवात र. वा. दिघे यांनी आपल्या ‘पाणकळा' (१९४0) कादंबरीपासून केली होती. आजवर मराठी कादंबरीत विशिष्ट प्रदेश व विशिष्ट व्यक्तिचित्रे केंद्रित करून कादंबरी लिहिली गेली नव्हती. र. वा. दिघे यांनी संतमाणूस भुजबा, आडदांड रंभाजी पाटील, रंगेल व रगेल राया, लावण्यमयी सोनी, ग्रामकन्या रैना चित्रित करून कादंबरीचा बाज बदलला. निसर्गवर्णनास महत्त्व दिलं. मग वि. द. चिंदरकरांची ‘महापूर (१९४२), ग. ल. ठोकळ यांची ‘गावगुंड' (१९४५) आली. या कादंब-यांनी फडके-खांडेकर पठडीला छेद देत नागरी जीवनास समांतर ग्रामीण जीवन तितक्याच रोचक पद्धतीनं चित्रित केलं गारंबीचा बापू' (१९५१) मधून श्री. ना. पेंडसे यांनी ग्रामीण कादंबरीचा पट अधिक कलात्मक बनविला. निसर्ग, व्यक्ती आणि परिसर असा त्रिवेणी संगम साधत त्यांनी राधा, बापू, यशोदा, अण्णा खोत या पात्रांचा धांडोळा घेत ग्रामीण जीवनाचं दु:ख आणि संघर्ष यांचं जिवंतपणे चित्रण केलं. गो. नि. दांडेकरांनी ‘पडघवली' (१९५५), 'शितू' (१९५३), ‘पवनाकाठचा धोंडी' (१९५७), ‘माचीवरला बुधा' (१९५८) सारख्या चरित्रकेंद्री परंतु प्रादेशिकता चित्रित करणाच्या कादंब-या लिहून वेगळा मार्ग प्रशस्त केला. मग समांतर आली, व्यंकटेश माडगूळकरांची 'बनगरवाडी' (१९५५). तिनं ओढग्रस्त माणदेश चित्रित करून ग्रामीण चित्रातील वेदना रेखांकित केली. एक प्राथमिक शिक्षक मेंढपाळांच्या वस्तीवर येतो व तिथलं जीवन पाहतो अशी भूमिका घेऊन झालेलं हे लेखन बनगरवाडी उजाड झाल्यावर त्याचं परतणं यात या जीवनाबद्दलची शहरी तटस्थताही चित्रित होते हा राजाराम म्हणजे लेखकाचंच प्रतिनिधी रूप. तो निरीक्षक म्हणा हवं तर. इंग्रजी साहित्यातील Pastoral Novel चा प्रभाव या लेखनावर स्पष्टपणे दिसून येतो. उद्धव शेळकेंची ‘धग' (१९६०), अण्णा भाऊ साठेंची

मराठी वंचित साहित्य/३७