पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कथा, कादंबरी, काव्य, नाटक असं सर्व तहेचं साहित्य ग्रामीण वाङ्मयात लिहिलं गेलं आहे. अलीकडे त्यात आत्मकथांचीही भर पडली आहे. मराठी ग्रामीण कथा विकासाचा प्रारंभ हरिभाऊ आपटे यांच्यानंतर जर कुणी जाणीवपूर्वक केला असेल तर तो वि. स. सुखटणकरांनी. सन १९३१ ला प्रकाशित त्यांच्या ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी' कथासंग्रहात आठ कथा आहेत. त्यांचा लेखनकाळ १९२६-२८ च्या दरम्यानचा आहे. गोमंतकाच्या या कथाकाराने गोवा, देवदासी, तेथील गावसंस्कृती, जगणं, वैर, ईष्र्या सान्यांचे वर्णन केलं आहे. लक्ष्मणराव सरदेसाईंच्या कल्पवृक्षांच्या छायेत', 'सागराच्या लाटा', 'वादळातील नौका', 'ढासळलेले बुरूज' या कथासंग्रहांतून प्रकाशित कथांचा वाङ्मयीन दर्जा उंचावल्याचे दिसून येते. प्रा. श्री. म. माटे यांच्या उपेक्षितांचे अंतरंग'मधील ग्रामीण जीवनास वंचिततेचा स्पर्श आहे. या कथा ग्रामीणतेपेक्षा सामाजिक व मनुष्यस्पर्शी होत. अनाथ बन्सीधर, दरोडेखोर पिच्या, मुकी सावित्री, तडफडणारा भिवा, ही सारी पात्रं, चरित्र या कथावाचकांच्या मनात कायमची घरं करतात ते त्यातील व्यथा-वेदनांच्या प्रभावी अभिव्यक्तीमुळे. पुढे ग. ल. ठोकळ, वामनराव चोरघडे, द. र. कवळेकर, प्रभृती कथाकारांनी लिहिलेल्या कथांतून आनुषंगिक असं ग्रामीण चित्रण दिसून येतं. ते चित्रण शहरी माणसाची ग्रामीण आस्था अशा स्वरूपाचं म्हणता येईल. या पार्श्वभूमीवर धनगावसारख्या सांगली जिल्ह्यातील छोट्या गावात राहून कथा, कादंबच्या लिहिणारे म. भा. भोसले यांच्या साहित्यात ग्रामीण कसाचा पोत वरकड ठरतो. त्यांच्या कथेवर त्या काळी चित्रपटही निघाला होता. नंतर नवकथेचा कालखंड मराठी कथात सुरू झाल्यानंतर गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भा. भावे यांचे समकालीन पण 'बनगरवाडी'मुळे अस्सल ग्रामीण जीवन चित्रित करणारे कथाकार म्हणून व्यंकटेश माडगूळकरांचा झालेला लौकिक हा त्यांच्या माणदेश जिवंत रेखाटण्याच्या कौशल्यामुळेच. हे कौशल्य शंकर पाटील यांनी पुढे विस्तारलं, विकसित केलं ते ग्रामीण भाषा, रग, रंग, अनुभव यांची जोड देऊन. ‘आभाळ', 'वेणा', 'भार', 'धिंड', ‘नाटक बसते आहे' कथा वाचकांनी वाचल्याच; पण या काळात व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, प्रभृती कथाकारांनी कथाकथनाचे मॅरेथॉन प्रयोग, सादरीकरण करून मराठी कथा वाचकानुवर्ती होती ती श्रवणीय व दृश्यात्मक बनविली. अण्णा भाऊ साठे, बाबूराव बागूल, नामदेव व्हटकर, शंकरराव खरात, प्रभृती कथाकारांनी ग्रामीण जीवनावर आधारित दलित वेदना मराठी कथेत आणली. मधू मंगेश कर्णिक, रणजित देसाईंनी कोकणगोवास्पर्शी ग्रामीण जीवन चित्रित केले. रा. रं. बोराडे यांनी मराठवाडा तर

मराठी वंचित साहित्य/३६