पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्रामीण साहित्य


 "खेडेगाव, तेथील जीवनपद्धती, तेथील अशा खास रीती, शेती, तेथील निसर्गाशी, मातीशी असलेले मानवी पण प्रदेशनिष्ठ वैशिष्ट्यपूर्ण संबंध, तेथील एकूण संस्कृतीला लाभलेली काही प्रादेशिक वैशिष्ट्ये, मानवी जीवनाला त्याच प्रदेशानुसार पडलेल्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, ज्ञानविषयक मर्यादा व त्यांतून उद्भवणारे प्रश्न आणि समस्या यांचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य" अशी व्याख्या डॉ. आनंद यादव यांनी केलेल्या ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या' या ग्रंथाच्या आधारे करता येईल. इंग्रजीत ज्याला 'Pastoral Literature' अथवा हिंदीत ‘आंचलिक साहित्य म्हणतात. त्याच्याशी याचं साधर्म्य सांगता येईल.
 मराठीत या साहित्याच्या पाऊलखुणा प्राचीन साहित्यापासून पाहावयास मिळतात. ज्ञानेश्वरकालीन साहित्यात ‘दृष्टान्त पाठ' वाचीत असताना तत्कालीन कृषिसंस्कृतीचं चित्र उभं राहतं. ते पुसट असलं तरी शेत, शेतकरी यांचं प्रतिबिंब त्यात आढळतं. अशीच चित्रं, नामदेव, तुकाराम, एकनाथादी कवीच्या काव्यात दिसतात; पण निखळ ग्रामीण चित्रणाचं साहित्य आढळतं ते मात्र विसाव्या शतकातच.

 पण तत्पूर्वी हरिभाऊ आपटे यांच्या ‘काळ तर मोठा कठीण आला' (१९१५) कथेत दुष्काळाचं चित्रण आलं आहे. महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न' (१८५५), ‘गुलामगिरी' (१८७३) आणि ‘शेतक-यांचा आसूड' (१८८३) सारख्या साहित्यातून ग्रामीण व्यथा, वेदना अधिक प्रखरपणे मांडल्या गेल्या. तो ग्रामीण साहित्याचा पहिला सशक्त आविष्कार मानला जातो. त्यांनी लिहिलेल्या ‘अखंडां'त (काव्य)ही कुणबी, कुळंबिणीचं चित्र आहे.

मराठी वंचित साहित्य/३५