पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आरोग्यविषयक दर्जा व संधीची समानता दिली का? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय समानपणे दिला का? गेल्या चौदा पंचवार्षिक योजनांचा आढावा घेतला तर आपणास असे दिसून येते की, या देशातील विकास योजना व त्यांवर होणारा खर्च हा सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर न होता मतदान, राजकीय विचारसरणी, धोरण, निवडणूक इत्यादी सत्ता गणितांच्या उत्तरांवर, आडाख्यावर होत असतो. परिणामी समाजात जे अल्पसंख्य, असंघटित, असुरक्षित आहेत; किंबहुना विकास योजनांचे जे पहिले हक्कदार आहेत त्यांच्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष सरकार कोणत्याही पक्षाचे असो; ते राज्याचे असो वा केंद्राचे - त्यात गेल्या पंचवार्षिक योजनांत सातत्य आढळते. परिणामी विकासाची फळे जात, धर्म, वंशाधारित वंचितांना सातत्याने मिळतात; पण जो वर्ग या सर्वांपलीकडचा आहे, विविध सामाजिक धारणा, परंपरा, चालीरीती, समज, रूढी यांची परिणती म्हणून अस्तित्वात येतो, अशा वर्गाबद्दल आपली भावसाक्षरता जशी तोकडी आहे, तसाच सामाजिक न्यायाचा तराजू अन्यायाकडेच झुकलेला आढळतो.

 स्वतंत्र भारताच्या वंचित विकासात जितके झुकते माप जात, धर्माधारित वंचितांना दिले गेले. त्या मानाने ते अन्य वंचितांना दिले गेले नाही. परिणामी ते विकासाच्या परिघाबाहेर राहिले. ते समाजाच्या मध्य प्रवाहात येऊ शकले नाहीत. समाजामध्ये दलितेतर वंचितांचा असा एक मोठा प्रवाह मनुष्य विकासाच्या प्रारंभापासून दिसून येतो; जो प्रारंभापासून आजअखेर अल्पसंख्य, समाजमान्यतेपासून दूर, उपेक्षित, जात व धर्मवास्तवाच्या परिघाबाहेर सतत जगण्याचा संघर्ष करणारा व अस्तित्वाची निकराची लढाई लढताना दिसून येतो. त्यात अनाथ, निराधार, पोरके, परित्यक्त, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, परित्यक्ता, विधवा, वेश्या, कुमारी माता, हुंडाबळी, बलात्कारी, तृतीयपंथी, दुभंगलेली कुटुंबे, विस्थापित अशा अनेक प्रकारे उपेक्षेचे जीवन जगणारी मंडळी वेद-उपनिषदांपासूनच्या काळात जशी दिसतात तशी आजही दया, करुणा, कणव, सहानुभूती, भूतदया इत्यादींसारख्या वृत्तीमुळे हा मनुष्य समुदाय सामान्य मनुष्य समुदायापासून सतत वेगळा व उपेक्षित राहिलेला आहे. समाजाने दाखविलेल्या धीरावर जगत हा समाजवर्ग धैर्याने संघर्ष करीत आज स्वाभिमान व स्वत्वाची लढाई खेळत अधिकार आणि हक्काच्या जाणिवेने जागृत व प्रगल्भ होत समाजविकासात आपला वाटा मागू पाहत आहे. वेळोवेळी लिहिलेल्या साहित्यातून त्यांचा उद्गार दिवसेंदिवस आग्रह, आक्रोश यापुढे जाऊन अधिकाराची भाषा बोलताना दिसतो.

मराठी वंचित साहित्य/२१