Jump to content

पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भारतातील वंचित विकास : प्रारंभ आणि विस्तार


 भारतीय समाजजीवन घडणीची स्वतःची अशी धाटणी आहे. ते मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतिबंध यांनी एकमेकांशी जोडलेले आहे. शिवाय भारतीय समाजधाटणीवर रूढी, परंपरा, चालीरीती, आचार-विचार पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी, पोशाख, दागिने या सर्वांचा मोठा परिणाम आहे. भारताचा पूर्वेतिहास आपण जेव्हा पाहू लागतो, तेव्हा आपणास असे दिसून येते की, या देशात चहूदिशांनी अनेक लोकसमूह येत राहिले आहेत. ते कधी स्थलांतर, कधी व्यापार, कधी धर्मप्रसार तर कधी साम्राज्यविस्ताराच्या आमिषाने वा महत्त्वाकांक्षेने येत राहिले. येताना ते आपली भाषा, संस्कृती परंपरा घेऊन आले. त्याचाही परिणाम येथील तत्कालीन समाजजीवनावर झालेला आढळतो.

 कुटुंबसंस्था, जातिव्यवस्था आणि ग्रामीण जीवन हे भारतीय समाजाचे मूलाधार होत. ते येथील व्यक्तिसमूहांना संघटित करतात. त्या संघटिततेचे आधार येथील जातवास्तव, धर्मपरंपरा असतात. भारतीय समाजजीवनाचा पाया शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. इथे पूर्वी बलुतेदारी पद्धती होती. त्यांची जागा सहकारी चळवळीने घेतली तरी ग्रामीण जीवनातील परस्परावलंबन पूर्वीचेच राहिलेले आहे. भारतीय समाजजीवनाचा स्थायीभाव सर्वसमावेशकता असल्याने येथील समाजांनी विविध प्रदेश व परदेशातून आलेल्या व्यक्तिसमूहांनाही आपल्यात सामावून घेतले आहे. इथली सारी स्थावर, जंगम संपत्ती असो वा पारंपरिक व्यापार, व्यवसाय, हक्क, अधिकार, पदे असोत त्यावर वंशपरंपरेचे मोठे वर्चस्व आढळते. त्यातून मग इथे हक्क आणि कर्तव्याच्या जाणिवाही पूर्वापर रूजत आलेल्या आहेत. इथल्या चातुर्वर्ण्य

मराठी वंचित साहित्य/१२