Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता।
 असे म्हणणारा मनू
  'न स्त्री स्वांतत्र्यमर्हति।' असे म्हणतो.
 मैत्रायणी संहिता म्हणते, 'स्त्री ही असत्य आहे.' तैत्तरीय संहिता म्हणते 'हीन पुरुषापेक्षा चांगली स्त्रीही वाईट असते. कठ संहिता म्हणते, 'रात्री खुशामत करून नवऱ्याकडून मागण्या पूर्ण करून घेण्याची पात्रता स्त्रीत असते.'
 वरील विधाने स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्याच्या प्रेरणाच कशा नष्ट केल्या गेल्या, होत गेल्या याची साक्ष देतात. मोहंजोदारो, हरप्पाची अत्यन्त प्रगत संस्कृती मातृसत्ताक होती असे प्रो. मार्शल म्हणतात. नायर, खासी समाजात आजही मातृसत्ता आहे. आजही शेतीव्यवसायात स्त्रियांचे योगदान अत्यन्त महत्त्वाचे असते. कालौघात अनेक आघात होऊनहीं, पुरुषसत्ताक जीवनव्यवथा स्वीकारूनही, भूमीशी निगडित अशा लोकाचारातून, विधीतून स्त्रीचे.... कुमारिकेचे महत्त्व कमी झालेले नाही. समृद्धी, पीकपाणी सुपीकता यांच्या देवता स्त्रीरूपीच आहेत.
 कन्येचा कृषियातुविधीत महत्त्वाचा सहभाग -
 वैदिक परंपरेपूर्वी स्त्री, कुमारिका आणि कृषिसमृद्धी, त्यासाठी आवश्यक वर्षावृष्टी, सूर्यप्रकाश यांच्यातील अनुबंधाबाबत काही 'आदिबंध' लोकमनात स्थिर झाले. आज ते आपल्याला काहीसे अव्यवहार्य किंवा चमत्कारिक वाटतात. उदा. प्रजापती आपल्या मुलीच्या मागे कामेच्छेने धावतो. या संबंधात नैसर्गिक घटनांचे विवरण केले तरी या चमत्कारिक समागमाची उपपत्ती लागत नाही. या संदर्भात 'अश्वत्थाची पाने' या ग्रंथात प्रा.सदाशिव अंबादास डांगे मांडतात. मुळात प्रजापती नसून प्रजापिता आणि दुहिता हे शब्द आहेत. ही दुहिता म्हणजे साक्षात मुलगी नसून धर्मदोग्ध्री म्हणजे जलवृष्टी करण्यास साहाय्य करणारी विधी कन्यका (Ritual-Girl) आहे. हे ध्यानात घेतल्याशिवाय या चमत्कारिक वाटणाऱ्या दन्तकथेचा अर्थ उलगडत नाही. सूर्य किंवा अंतरीक्ष हे धर्म होय. त्यातून स्त्राव करायचाम्हणजे जलवृष्टी करावयाची त्यासाठी समागमाचे हे विधीकृत्यं करावयाचे. आणि अशा प्राचीन वैदिक आणि अवैदिक परंपरांना उद्देशून 'इति-ह-आस', अशी वहिवाट होती असे म्हणत. अशा तऱ्हेच्या अतर्क्य कथांचे संदर्भ महाभारतातही सापडतात. कन्या अर्पण करून जलवृष्टी विधी संपन्न करण्याची ही परंपरा भोंडला भुलाबाई या कुमारिका उत्सवांचा, त्यांतील सर्जन वर्षनाबद्दलच्या संदर्भाचा,

भूमी आणि स्त्री
९१