पान:भूमी आणि स्त्री.pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भोंडल्याच्या "ऐलमा पैलमा गणेशदेवा' या नमन गीतातून पाऊस, विश्वाला फुलविणारा माळी, भातांच्या ओंब्या यांचे अंधुक संदर्भ सापडतात. तीळ, तांदळाचे उल्लेख येतात. भारतीय संस्कृतीमधील अनेक सणव्रते यांत तिळाला विशेष महत्त्व असते. तीळ हे मांगल्यदर्शक आहेत. समर्पणाचे प्रतीक म्हणून तिळाची अंजुली वाहण्याचा प्रघात आहे. तांदूळ हे 'अक्षत' तेचे-Virgin- प्रतीक आहेत. विवाहात अक्षदा म्हणून तांदळाचा उपयोग करतात. तीळ हे गळीत धान्य आणि तांदुळ प्राचीन काळापासून ज्ञात आहेत. एखाद्या उपवर मुलीस आई म्हणते, 'कुण्या घरचे तीळ तांदूळ तुझ्या नशिबात आहेत?' वरील ओळीतून धान्यलक्ष्मीचे ध्वनिचित्र प्रतीत होते. अन्नोत्पादनासाठी गायल्या जाणाऱ्या सामूहिक गीतांत.... स्वरसमूहांत एक मंत्रात्मकता असते आणि भोवंडून टाकणारी लय असते.
 भोंडला वा हादगा, भुलाबाई, भराडीगौर या मुलींच्या.... कुमारिकांच्या उत्सवांतील गाणी शिवेच्या आत नव्हे तर शिवेच्या पैल, मोकळ्या शेतात गायिली जात असावीत. ही गाणी समूहात गायिली जात असल्याने त्यातील स्वर अतिशय सुलभ आणि शुद्ध असतात. त्यांत हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या वाहत आलेली एकसुरात्मक अशी लय असते. त्या लयीतून त्यांचे पुरातणत्व जाणवते.
 कुमारिकांच्या व्रतात मांडणीला खूप महत्त्व असते. भुलाबाईचे मखर फुलांनी, रंगीत कागदांनी सजवले जाते. त्यांत कोवळी कणसे, धान्याची ताटे, फळे, उसाचे तुरे यांचा उपयोग केला जातो. विदर्भातील भराडी गौर मांडताना विविधरंगी फुलांनी झेले मांडले जातात. हादगा व भोंडल्यात पाटावर डाळ तांदूळ वा रांगोळीचा हत्ती काढला जातो. भोवताली फुलापानांची सजावट केली जाते. हत्तीच्या खाली पहिल्या दिवशी एक ठिपका काढला जातो. रोज एक एक ठिपका वाढवितात.
 साॅंझी : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील देखणा कुमारिकोत्सव -
 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात 'साँझी' २० मांडताना विविध रंगी सजावट केली जाते. हिरवेगार शेण घेऊन ते मातीत कालवून त्याचे विविध लोकप्रिय आकार भिंतीवर चितारले जातात. या सजावटीला 'सांझीका खिल जाना' असे म्हणतात. डॉ. श्याम परमार त्यांच्या 'मालवी लोकसाहित्य का अध्ययन' या ग्रंथात ते लिहितात, 'सांझी कुंवारी कन्याओंका एक अनुष्ठानिका व्रत है। राजस्थान, पंजाब

भूमी आणि स्त्री
८७