Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मातीच्या पणत्या, फुले असा आरतीचा थाट असतो. त्याला फुलोरा म्हणतात. भराडी गौरवतातही परडीवर फुलांची सजावट असते. रात्री इनाईच्या पुढे हल्या मारण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. दुसऱ्या दिवशी इनाईला पाटीत बसवून शेतात वाजत गाजत नेतात. तिथे तिला जिरवून टाकतात. मातीत माती मिसळवून टाकतात. गेल्या काही वर्षांत ही प्रथा नष्ट झाली आहे.
  वाजतगाजत गेले वरल्या राना
  वरल्या रानाची आणली माती
  चिकण माती थेंब थेंब पाणी
  आधी घडवा पुढचा हत्ती
  मंग घडवा पुढचा हत्ती
  मंग घडवा सकुपती
  मंग घडवा इनाई सरोसती
  मंग घडवा अडचं बाय...
अशा तऱ्हेची अनेक गीते स्त्रिया गातात. इनाईत सकु बाबा म्हणजे शंकर आणि इनाई ही सरस्वती आहे. सरस्वती कुमारिकेचे प्रतीक आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याठिकाणी सरस्वती आणि पार्वती यांना एकरूप मानले दिसते. यांचे बरोबर बाळ असते. भुलाबाईतही भुलोबा आणि चिलया वा गणेश बाळ असते.
 बीज : शंकर : क्षेत्रपाळ -
 श्रावण, भाद्रपदातील बहुतेक व्रते, उत्सव स्त्रीप्रधान आहेत. शंकर आणि पार्वती या देवता अतिप्राचीन काळातील असून काळाच्या ओघात वैदिक आर्यांनी त्यांचा स्वीकार केला. स्वीकारताना त्यांच्यावर आर्यकल्पनांची संस्करणेही झाली. गणसत्ताक समाज स्त्रीप्रधान - मातृसत्ताक होता. बीजाचे महत्त्व जाणल्यावर बीजाला.... शंकराच्या, क्षेत्रपाळाच्या रूपात स्वीकारले गेले. शंकराच्या पिंडीचा आकार पाहता असे लक्षात येते की, योनी आणि लिंग यांच्या समागमाचे, ज्यातून सर्जन होते, नवनिर्मिती होते, याचे ते प्रतीक आहे. आज त्यांची मंदिरे झाली तरी खरी मंदिरे सामान्य माणसांच्या जीवनातील विधी, उत्सव, सण, व्रते आणि तत्संबंधी गीते यांत आहेत. यातुशक्तीच्या संदर्भातील श्रद्धा आणि संकल्पना थेट मातीशी, तिच्यातील सर्जनतेशी जोडलेल्या आहेत.

भूमी आणि स्त्री
८५