Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भराडी गौर : कुमारिकांचा कलात्मक उत्सव -
 वऱ्हाडात भराडीगौर मांडली जाते. ती श्रावणात. सर्वसाधारणपणे हा उत्सव श्रावण पौर्णिमेपर्यन्त असतो. तो कुमारिकांचा असतो. जिच्या घरी गौर बसविली जाते तिला मुखरिण म्हणतात. नदी वा तलावावर जाऊन वाळूचा महादेव करतात. नदीतून वाळू काढताना,
  'खडक फोडू माती काढू
  निघा निघा गवराई'
असे पाच वेळा म्हणतात. वाळूचा महादेव पार्वतीचा जोडा परडीवर बसवून मुखरिणीच्या घरी थाटामाटाने मिरवत आणून प्रतिष्ठा करतात.
  खणखण कुदळी मण मण माती
  देऊळ खचलं चांदण्याराती
  चांदण्यारातीचे माणिकमोती
  घाल घाल गौराई आपुल्या नाकी ...
  अंगणी दूध तापे
  त्यावरी पिवळी साय
  गवराई लेकी
  आज राहून जाय
या सारखी अनेक गाणी मुली म्हणतात. गौरीचे विसर्जन पाण्यात करतात. विसर्जनाच्या दिवशी मुलींना जेवण दिले जाते. निमंत्रित मुली मुखरिणीला आहेर करतात. परड्या, पानांनी सुरेख सजवतात.
 इनाई : सरस्वती -
 हादगा, भुलाबाई, भोंडला, भराडी गौर आणि विदर्भातील महार समाजात दसऱ्याच्या वेळी इनाई बसवतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी दुपारी बारा वाजता जोड्याने रानात जातात. पाटीभर काळी माती पूजा करून वाजत गाजत घरी आणतात. दसरा सण चित्रा नक्षत्रात असेल तर मातीचा घोडा बनवून त्यावर इनाई सरस्वतीची मूर्ती घडवतात. हस्त नक्षत्र असेल तर हत्ती बनवून त्यावर इनाईची मूर्ती घडवतात. शेजारी तिचा सुकदेव आणि बाळ असते. मातीच्या मूर्तीची मांडणी झाली की समोर कणकेचे पाच गोळे ठेवतात. त्याला फळ म्हणतात. पाचदहा लिंबे,

८४
भूमी आणि स्त्री