पान:भूमी आणि स्त्री.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजातील स्त्रियांबद्दलच्या विश्वासार्हतेचे काही मुद्दे हाती येतात.
 भारतीय व्रतोत्सवांत कुमारिकांना विशेष स्थान -
 विवाह न झालेल्या, पुरुषांशी संबंध न आलेल्या, अनाघ्रात स्त्रीस कुमारिका म्हणतात. प्राचीन काळी स्त्रिया आजन्म अविवाहित राहत, त्यांना वृद्धकुमारी, जरत्कुमारी, ब्रह्मकुमारी असे म्हणत. असे अष्टाध्याईवरून कळते (अष्टा. २.२५) तुळस ही कुमारिकेचे प्रतीक असून कार्तिकात तिचा बाळकृष्णाशी विवाह झाल्यानंतरच विवाहमुहूर्त काढण्याची प्रथा आहे. मध्य प्रदेशातील एका ब्राह्मण जातीत वयात येणाऱ्या कुमारिकेच्या चोळीवर तुळसमंजिरी, रुईफुले यांचा कशिदा काढण्याची प्रथा आहे. भारतीय व्रतोत्सवांत कुमारिकांना विषेश महत्त्व असते. भारतातील वस्त्र विणण्याची कला स्त्रियांनी विकसित केली. 'वयन्ति' या शब्दाला पुल्लिंग नाही. पूर्वी विणण्याचा व्यवसाय स्त्रियाच करीत असाव्यात. भरतकाम आणि विणकामात रुईचे फुल, तुळसमंजिरी, वृंदावन, मोर यांना विषेश महत्त्व आहे. धनधान्य समृद्धीशी संबंधित व्रते कुमारिकांच्या सहभागाशिवाय पूर्णत्वाला जात नाहीत. कुमारिकांमधील सुफलनशक्ती पूर्णत्वाला पोहोचलेली असते ही श्रद्धा जगभरच्या संस्कृतींमध्ये होती. म्हणूनच त्या कृषिसंबंधित विधींमध्ये-सणांमध्ये अत्यन्त महत्त्वाच्या पूजनीय अशा मानल्या जातात. अंबाजागाईची योगेश्वरी-जोगाई, कन्याकुमारी या कुमारीमाता आहेत. 'कुमारी पुत्र' या संकल्पनेलाही समाजात विषेश स्थान मिळाले. दैवीप्रसादामुळे कुमारिकांना झालेले पुत्र दैवी शक्तीने भारलेले असतात, असा कथाबंध सर्वत्र आढळतो. एखाद्या वस्तूच्या स्पर्शाने, सूर्यकिरण स्पर्शाने वा एखाद्या सरोवरात स्नान केल्याने गर्भधारणा झाल्याच्या कथा लोकसाहित्यात आढळतात. कुंतीला कौमार्यभंग न होता 'कर्णा' सारखा तेजस्वी पुत्र झाला. महात्मा येशु ख्रिस्त हे 'कुमारीपुत्र' होते.
 आठव्या वर्षीच विवाह का? -
 आठ वर्षे, दहा वर्षे आणि बारा वर्षे हे कुमारी अवस्थेचे तीन महत्त्वाचे टप्पे. सोम, गंधर्व आणि अग्री हे कन्येचे दैवीपालक मानले आहेत. सोम तिचा प्रथम उपभोग घेतो, १०व्या वर्षी तिचे स्तन पुष्ट होऊ लागल्यावर गंधर्व तिचा उपभोग घेतो आणि रजोदर्शन झाल्यावर अग्नी तिचा उपभोग घेतो. म्हणून तिघांनी उपभोग घेण्यापूर्वीच

७०
भूमी आणि स्त्री