पान:भूमी आणि स्त्री.pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थेतून राजसत्ताक व्यवस्थेत होत जाणारे परिवर्तन त्यातून निर्माण हाणारी अस्थिरता यामुळे मानवी विकासाच्या एका टप्प्यावर स्त्रियांचे समाजातील व कुटुंबातील स्थान दुय्यम होत गेले. घराच्या चौकटीत त्यांचे व्यक्तिमत्त्व बंदिस्त झाले. त्यांनी अध्ययन करू नये, प्रश्न विचारू नयेत, वाट्याला आलेले जिणे जगावे असे संकेत निर्माण झाले.
 स्त्रीच्या स्थानातील परिवर्तन : त्याचा व्रत, विधी, उत्सव यांवर परिणाम -
 पुरुष आणि स्त्री यांना निसर्गाने समान बुद्धी दिली, स्वरयंत्र दिले, विचार करण्याची शक्ती दिली, परंतु समाजाने त्यांच्यात हीनभाव निर्माण केला. सामाजिक न्यायापासून त्यांना वंचित ठेवण्याचा पायंडा पडला. त्यांचा समाजातील वावर बंदिस्त झाला. भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेचे सामर्थ्य लक्षात घेऊन निर्माण झालेल्या प्राथमिक कृषिजीवनात निर्माण झालेल्या विधींमध्ये, उत्सवांमध्ये बदल होत गेले. या उत्सवात गायले जाणारे मूळ मंत्र, वा गाणी यांच्या आशयात व अभिव्यक्तीत बदल होत गेले. उदा. भोंडला भुलाबाई सारख्या वर्षनसर्जनशी जोडलेल्या कुमारिकाच्या उत्सवातील मूळ गाणी लोप पावून, त्यात सासरी होणाऱ्या छळाचे वा गुदमरलेल्या श्वासाचे चित्र रेखाटले जाऊ लागले. मानवी विकासाच्या प्रवासात कुमारिकेला विवाहाच्या संदर्भात असलेले स्वातंत्र्य वा मोकळीक संपली. १५-१६ वर्षांच्या युवतीला सद्योतवधू..... गृहिणी व्हायचे की साधना करणारी ब्रह्मवादिनी व्हायचे याचा निर्णय घेण्याची सुविधा नष्ट झाली. आठ वर्षांच्या कन्येचा विवाह झालाच पाहिजे. ही प्रथा रुढ झाली. अर्थातच त्याचा परिणाम, या विधी, उत्सव, व्रतांवर झाला. श्रावणातील विविध व्रते व सण, भाद्रपदातील गौरीगणपती, भुलाबाई, आश्विनातील नवरात्र, इनाई, हादगा वा भोंडला, भराडी गौर, मार्गशीर्ष, पौषातील सटीचे नवरात्र, शाकंभरी, संक्रान्त, फाल्गुनातील वसंतोत्सव, चैत्रातील गौर, वैशाखातील अक्षय्यतृतीया, कानबाई इत्यादी सणव्रतोत्सवांच्या खोलात शिरल्यास आदिमकाळातील प्राथमिक कृषिप्रधान संस्कृतीत निर्माण झालेल्या या. व्रत,सण, विधी व उत्सवांमागील, कृषिउत्पादनांच्या समृद्धीसाठी, जमिनीची सुफलन शक्ती वाढावी यासाठीची श्रद्धा स्पष्टपणे जाणवते. त्या संकेतातून एकात्म भारतीय संस्कृतीच्या विकासातील काही महत्वाची पाने हाती लागतात त्यातून भिन्न भाषा,भिन्न वेश, भिन्न रीतीरिवाज यांनी नटलेल्या भारतीय जीवन पद्धतीतील सर्वांगीण एकात्मतेचे, कृषिविकासातील स्त्रियांच्या कृतिशील सहभागाचे आणि

भूमी आणि स्त्री
६९