Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शौर्ययुगात (खि.पू. १००० ते ५००) प्रवेश केला. वेदांत वर्णिलेल्या परिस्थितीतून रामायण, महाभारत या महाकाव्यात चित्रित केलेल्या परिस्थितीत प्रवेश केला. व्यावसायिक चौकटी कठोर होत गेल्या. आनुवंशिकता आणि जातिभेद कडक होत गेले. स्त्रियांभोवतीची बंधने अधिक कठोर होत गेली आणि पुढे मध्ययुगात त्याची परिसीमा झाली. कारण भारतावरील परकियांची आक्रमणे वाढली.
 लिंग-निसर्गनिर्मित तर, लिंगभाव-समाजनिर्मित -
 या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. अतिप्राचीन काळात स्त्रीच्या सर्जनक्षमतेबद्दल मानवसमूहात गूढतामिश्रित कुतुहल आणि भययुक्त आदर असल्याने, स्त्री आणि पुरुष या दोनही लिंगांना - ही लिंगे धारण करणाऱ्यांना समान मानले होते. किंबहुना स्त्री बद्दल विषेश आदराची भावना होती. 'मदर गॉडेस' - आदिमाता - आदिशक्तीची संकल्पना त्यातून आली. ही दोनही लिंगे समर्पित भावनेने एकत्र आल्याशिवाय सर्जन होत नाही याची जाणीव त्यांना झाली. योनिपूजा आणि लिंगपूजा अतिप्राचीन काळापासून भारतात रुढ आहे. 'बीजा' चे महत्व जाणल्यावर दैवी दाम्पत्याची संकल्पना निर्माण झाली. सुरुवातीस या दांपत्यातील उभयतांचे स्थान बरोबरीचे...समान होते. उत्तरोत्तर त्यात परिवर्तन होत गेले. शिव आणि पार्वती हे आदिदाम्पत्य सोडल्यास इतर दाम्पत्यांत 'स्त्री'ला दुय्यमत्व येत गेले. ज्या देशात.....मानव समूहांत कृषिजीवींचे स्थान मध्यवर्ती वा महत्त्वाचे होते तेथे मातृसत्ताक समाजव्यवस्था होती. भारतातील अतिप्राचीन समाज कृषिजीवी होता. मातृसत्तेचे अंधुक अवशेष केरळातील नायर, हिमालयातील खासी जमातीत सापडतात. भारताचा इतिहास द्रविड, आर्य, दस्यु, नाग, असुर, पणिन्, दास अशा अनेकविध टोळ्यांच्या आगमनातून, त्यांच्यातील संघर्ष, समन्वय आणि स्वीकार प्रक्रियांतून घडत गेला आहे. मात्र आजही अतिप्राचीन काळापासून भारतीय लोकजीवनाचे कृषिजीवनाशी असलेले.....जडलेले अतूट नाते, भारतभरच्या विविध सणांतून, व्रतांतून, वीधीतून आणि त्यांच्याशी जोडलेल्या गीतांतून दृगोचर होते आणि त्यातून प्रथमावस्थेतील कृषिजीवनात स्त्रीच्या विविध रूपांना समाजात असलेले महत्त्वाचे स्थान आणि त्यांची समाजातील तसेच कुटुंबातील सन्माननीयत्व जाणवते. जोवर कृषि आणि कृषिनिर्भर (वस्त्र इ. व्यवसाय) व्यवसायातून स्त्रियांचा उत्पादक म्हणून सहभाग होता तोवर त्यांना निर्णयात सहभागी होता येत होते. चाक, नांगर आदीयंत्रांचा शोध, तसेच टोळ्यांत सातत्याने होणारे संघर्ष, गणसत्ताक

६८
भूमी आणि स्त्री