Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाते. स्त्रीचा पुरुषाशी समागम होऊन ती सुफलित होते व तिच्या गर्भात नवा जीव वाढू लागतो तेव्हा ती गर्भवती होते. तिची कुमारिका अवस्था संपून ती मातृत्वाच्या दिशेने विकसू लागते. बालक जन्माला घातल्यावर ती माता होते.
 कन्या शब्दाची व्याप्ती -
 महाभारतातील वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य कुंतीला म्हणतो, ' हे कुंती कन्या शब्दाची उत्पत्ती 'कम्' धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा असणे ही लोकांची स्वाभाविक स्थिती नसून विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत.यास्तव तू माझ्याशी समागम कर, समागम केल्यावरही तू पुनरपि कुमारिकाच म्हणजे अक्षतयोनी राहशील आणि हा प्राचीन सनातन धर्म आहे. आदिपर्वाच्या ११२ व्या अध्यायात कुंतीचे व पंडूचे संभाषण दिले आहे. त्यात प्राचीनकालीन स्त्रीधर्माचे निरुपण करताना पंडू म्हणतो, 'अतिप्राचीनकाळी कन्या कौमार्यावस्थेपासून पतिमर्यादेचा अतिक्रम करीत व तो अतिक्रम अधर्म समजला जात नसे. हे सारे तत्कालीन समाजाला संमत होते. पुढे तो सांगतो की, हे सनातन धर्मतत्त्व स्त्रियांना सुखप्रद असल्यामुळे उत्तर कुरु क्षेत्रात हा व्यवहार आजही (महाभारत काळात) आहे.'
 यु म्हणजे जुडणे. युवक म्हणजे जुडणारा वा समागम करणारा. अतिप्राचीन आर्षसमाजात समागम करण्यास योग्य अशा युवक, युवतीना संभोग करू देत.
 स्त्रियः पवित्रमतुलम् -
 यावरून असे लक्षात येते की, 'कुमारिका ही सुफलित होण्यासाठी सर्वांगाने उत्सुक आणि उत्फुल्ल अशी, जिच्यातील उर्वरा शक्ती वा सर्जनक्षमता पूर्णत्वाला पोहोचलेली आहे, यातुशक्तीने अपरंपार भारलेली जणु भूमीच, अशी श्रद्धा अतिप्राचीन काळी असावी. वराहमिहीर बृहत्संहितेमध्ये लिहितो -
  स्त्रियः पवित्रमतुलं नैना दुष्यन्ति कहिंचित्।
  मासि मासि रजोहयासां दुष्कृतान्यपकर्षति ।।
     (वराहमिहिर इ.स. पूर्व ३३)

६६
भूमी आणि स्त्री