पान:भूमी आणि स्त्री.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याची शक्ती तिला प्राप्त झालेली असते.
 कन्या रजस्वला झाली तरच ती 'फळ' धारण करू शकते. म्हणूनच कन्येच्या 'रजस्वला' होण्याचा सन्मान केला जातो. महाराष्ट्रात देवी चे रूप कुमारिकेचे आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरीने तर विवाह आवर्जून टाळलेला आहे. कुमारिका ही परिपूर्ण तेजाचे प्रतीक मानली आहे. देवीच्या उत्सवांत, श्रावणात सवाष्णीबरोबर कुमारिकेचा सन्मानजेवण, दक्षिणा देऊन केला जातो. राजस्थानी समाजातही ऋतुमती झाली की गोड जेवण करतात. गाणी म्हणतात.
 स्त्रियांच्या उत्सवात गाण्यांना महत्त्व असतेच. काही ओव्या या ठिकाणी दिल्या आहेत.
 ऋतु प्राप्त झाला -
 आज सुदिन उगवला तिला ऋतु प्राप्त झाला
      ऋतू प्राप्त झाला ॥
 लाजूनी उभी एकीकडे, शिंपी केशराचे सडे
 पाट रांगोळ्या तबकी विडे, तिला बसविले॥
 मखरी सोनियाचे खांब आरसे लाविले रुंद रुंद
 काचेचे जडित भिंग, वरती राघू कोकिळा॥
 पाची पक्वान्नांचा थाट, अडणीवरी शोभे ताट
 भाज्या, चटण्या , कोशिंबिरी, खावे ना तिला ॥
 पिवळे पातळ केशरी, चोळी जरी बुट्टेदारी
 शोभे दागिने नानापरी, बिंदी बिजवरा ॥
 न्हाऊ घातले चतुरदिनी बहुत सुवासिनी
 फळांनी ओटी भरूनी, ऋतू प्राप्त झाला।
 न्हाणुली विवाहिता असे -
 पूर्वीपासून मुलीचा विवाह आठव्या वर्षी होत असे. आजही ग्रामीण भागात पहिल्यांदा नहाण येताच मुलीच्या लग्नाची घाई केली जाते. न्हाणुलीला गायिली जाणारी गाणी परंपरेने चालत आलेली आहेत. यापूर्वी नमूद केले आहे की, पूर्वी

भूमी आणि स्त्री
६१