उत्सव न्हाणुलीचा -
गौरी, कन्या या अवस्थेतून कन्या 'कुमारिका' या अवस्थेपर्यन्त पोहोचताच. ती ऋतुमती होते. रजस्वला होते. महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात या अवस्थेला 'मुलगी शहाणी झाली' हा वाक्प्रचार वापरतात. या साठी 'वयात येणे', बाजूला बसणे, 'न्हाण येणे' 'पाळी येणे' हे शब्दप्रयोगही केले जातात. 'मुका नातू' झाला हा वाक्प्रयोगही केला जातो. मुलीला पहिल्यांदा न्हाण येते तेव्हा घरात आनंदोत्सव साजरा केला जातो. तिला सन्मानाने मखरात बसविले जाते. तिची फळांनी ओटी भरतात. घरात पक्वान्न करतात. आसपासच्या महिला, नातलग नववयसा मुलीसाठी गोडाधोडाची शिदोरी पाठवितात. घरात 'कानोले' तळतात. ही पद्धत खास मराठवाड्यातील आहे. कानोले म्हणजे करंजीमध्ये गोडाचे सारण भरून तिला, दोन्ही पदर एकत्र करून मुरड घालून बंद केलेली असते. स्त्रियांच्या व्रतांत कानोल्यांना महत्त्व आहे. या संदर्भात मिळालेले उत्तर असे. मुलीने सतत मागे वळून पाहावे माहेरी मुरडून... वळून पाहावे यासाठी कानोले करतात.
पाचव्या दिवशी तिच्या डोक्यावर पाणी घालून मगच तिला स्पर्श करतात आणि सुगंधी तेल उटणे लावून तिला न्हाऊ घालतात. ऋतुमती झाल्यानंतरचे चार दिवस तिला बाजूला बसवले जाते. तिला कोणीही स्पर्श करीत नाहीत. काही कारणांनी स्पर्श करावा लागला वा चुकून स्पर्श झाला तरी स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला डोक्यावरून आंघोळ करावी लागते. कर्नाटकात, मराठवाड्यात महाराष्ट्रात पूर्वी वाजंत्री लावून, घरोघर साखर वाटून 'मुका नातू' झाल्याचे सांगितले जाई. पाचव्या दिवशी सवाष्णी व कुमारिकांना जेवणास बोलावून सन्मान केला जाई. हळदीकुंकू समारंभ करीत. शिदोरी घेऊन येणाऱ्या महिला तिची खण व पाच फळांनी ओटी भरतात. पूर्वी मुलीचा विवाह न्हाण येण्यापूर्वी होत असे. त्यामुळे नहाण आल्यावर पाचव्या दिवशी तिच्या माहेराहून पलंग, गादी, जोड आहेर, चांदीचा ग्लास अशा वस्तूंचा साग्रसंगीत आहेर केला जाई. या दिवशी मुलीची पतीबरोबर पहिली भेट होत असे.
कन्या साधरणतः वयाच्या १२ व्या वर्षी ऋतुमती होते. 'संप्राप्तेद्वादशेवर्षे कुमारित्यभिधीयते' ते यामुळेच म्हटले आहे. हा आनंद ती 'पूर्ण स्त्री' झाल्याचा असतो. तिच्यातील सुफलित होण्याची क्षमता पूर्णत्वाला पोहोचते. बीज धारण करून त्याला अंकुरित करण्यासाठी लागणारी चेतस् शक्ती म्हणजेच सुफलित
पान:भूमी आणि स्त्री.pdf/६५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६०
भूमी आणि स्त्री