पान:भूमी आणि स्त्री.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजही ही गाणी प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील गोंधळी, पांगुळ, वासुदेव, डहाक, पोतराज, धनगर, नागमंत्री, सहदेवभाडळी, आदींची गाणी पाहिल्यास असे लक्षात येते की ही गाणी वृक्ष, जमीन, पाऊस, वारे आदी निसर्ग आणि या निसर्गाचे मानवी जीवनाशी असलेले नाते यावर आधारलेली असतात. आजही कोकणात फळे देणाऱ्या झाडांचा स्त्रीलिंगी उल्लेख होतो. उदा. - फणशिणीला फळे आली किंवा पेरवीण म्हणजे फळे येणारे पेरुचे झाड.याला अपवाद आंबा. नांदेड जिल्ह्यात आंबा आणि जांभूळ यांचा विवाह साजरा करण्याची प्रथा होती. (डॉ. प्रभाकर देव - कंधारचा इतिहास). या लोकदैवतांचे कालौघात उन्नयन झाले तर काहींचे रूपांतर झाले. वैदिकांनी या दैवतांचा स्वीकार करताना त्यांना नवे अनुबंध दिले. आज उच्चभ्रू मध्यमवर्गीय समाजात महाराष्ट्रातील बहुजन समाजात, ज्यात मराठा, माळी, कुणबी, वंजारी, वाणी, ब्राह्मण आदी अनेकविध पुढारलेल्या जातिजमाती येतात. त्यांच्यात गौरीगणपती, लक्ष्म्या, नवरात्र, शाकंभरी, चंपाषष्ठी, ऋषिपंचमी, नागपंचमी, कानबाई आदी अनेक व्रते व सण साजरे केले जातात. परंतु मूलतः हे सण, व्रते, उत्सव आणि तत्संबंधी दैवते कृषिपरंपरेशी, कृषिसमृद्धीशी जोडलेली आहेत.

भूमी आणि स्त्री
५५