Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
निवेदन

 लोकसाहित्याबद्दलची उत्सुकता मनात उमलत्या वयापासून होती. भुलाबाई, खानदेशात मोठ्या प्रमाणावर मांडली जाई. आमच्या घरात आजोबा असेपर्यंत सणवार नियमितपणे होत असत. पण त्या सणावारांचा भर त्या निमित्ताने करावयाच्या पदार्थांवर अधिक असे. पूजा, विधी, मांडणी यांवर नसे. धुंदुर्मासात पहाटे उठून आई साग्रसंगीत स्वयंपाक करी. वांगी, उसावरच्या शेंगा, मेथी, गाजर आदी अनेक भाज्यांची मिसळीची भाजी, तीळ लावून केलेल्या बाजरीच्या गरम भाकरी, लोणी, तुरीचा डाळ, मुगाची डाळ घालून केलेली मसालेदार खिचडी, कढी असा बेत असे. सूर्य उगवण्यापूर्वी जेवणे होत. नागपंचमीला तांदळाच्या रव्याच्या, शिऱ्याच्या वड्या-खांडवी होत. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक, संक्रान्त दहा जानेवारीलाच करावी लागे. कारण टिळक पंचांगानुसार संक्रान्त दहाला असते. त्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या महिलेची परीक्षा घेणाऱ्या गुळाच्या पोळ्या कराव्या लागत. मराठवाड्यात केल्या जाणाऱ्या तेलच्या वेगळ्या. ही सगळी मजा ते असेपर्यंत होती.
 आई-पपांचे घर सर्वांसाठी खुले होते. ते नेहमीच भरलेले असे, पपांचा 'देव' या संकल्पनेवर विश्वास नव्हता. आईने त्यांचे विचार समजून घेऊन त्यांना एकरूपतेने साथ दिली. पण संध्याकाळ झाली की ती शुभंकरोती म्हणायला लावी. आजोबांनी देवघराचा आग्रह कधीच धरला नाही. मी दहावीत होते. कंठ फुटायला लागला होता. मी आजोबांना एकदा विचारलेच.
 "बापूसाहेब , तुम्ही एकादशी करता, सणावाराला सर्व पदार्थांनी साग्रसंगीत भरलेले ताट समोर लागते. सर्वांच्या घरात असलेले देवघर का नाही आपल्या घरात?"
 आजोबा मिनिटभर नुसते बघत राहिले नि त्यांच्या 'शैल्लमा'ला त्यांनी जवळ बसवून घेतले आणि सांगितले, 'अम्मा देवघर, देव पूजा हे सगळे मनाचे खेळ आहेत. शेजारचे आजोबा परदेशी जाऊन आले, मडमेला घेऊन आले. तरीही भटजीबुवा त्यांच्या घरी जाऊन साग्रसंगीत श्राद्ध करतात. का? तर ते भरपूर दक्षिणा देतात. आणि तुझा बाप कॉलेजात असताना माणसांबरोबर जेवला,

भूमी आणि स्त्री