पान:भूमी आणि स्त्री.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवहारांचे नियंत्रण करणाऱ्या गावकीचे एकमेव श्रद्धास्थान व निष्ठास्थान असलेल्या स्थळीय जनपद देवतांची उपासना सर्वस्वी ऐहिक स्वरूपाची आहे. ही पूजा वैदिकांना प्रारंभी अप्रिय वाटली तरी त्यांनी त्याचा कालौघात स्वीकार केला.' या प्रकारच्या दैवतांची उत्पत्ती कशी झाली या विषयी विवेचन करताना ते लिहितात, 'निसर्गातील प्रबळ, सुष्ट, दुष्ट शक्तींची प्रचीती व या शक्तींच्या सावटाने झाकोळलेल्या जीवनाची अनिश्चितता यांच्या द्वंद्वातून यक्षदेवदेवतांची कल्पना निर्माण झाली.' वीरमरण प्राप्त झालेले, मौंजीबंधन झालेले परंतु बालवयात मृत झालेले ब्रह्मचारी हे मृत्यूनंतर यक्षरूप होतात असा समज सर्वत्र रुढ आहे. या ठिकाणी एक स्मरण होते -
 १९८७ च्या मे महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या निमित्ताने जर्मनीस भेट देण्याचा योग आला. परिषद फ्रैंकफुर्टपासून २५/३० किलोमीटर्स दूर असलेल्या मौलोफ नावाच्या खेड्यातील वृद्धाश्रम केंद्रात होती. गावात घरे ४२ आणि गावात राहणारी माणसे जोमतेम वीस पंचवीस. प्रत्येक घरासमोरच्या अंगणात चिमुकली बाग, एखादा छोटासा किल्ला असायचा आणि त्यात दाढीवाल्या, बुटक्या, डोक्याला विदूषकी लांबटोपी घातलेल्या हसऱ्या वयस्क यक्षाचा चिमुकला रंगीत पुतळा उभा असायचा. मी उत्सुकतेने चौकशी केली असता कळले की त्या देशातही ते पुतळे रक्षणकर्ते, मदतकर्ते आणि दुष्टांना त्रास देणारे असे असतात अशी श्रद्धा आहे. यक्ष ही संकल्पना जगभर रुढ असावी का? नव्हे आहेच.
 आपल्या घरात पिंपळ असू नये अशी समजूत आहे. कारण मुंजा पिंपळावर असतो. महाराष्ट्रात डहाकाची गाणी गायिली जातात, त्यात मुंजोबाचे गाणे असते. त्यात लहान बाळाच्या अंताची कहाणी आहे.
 आदिवासींच्या पाड्यावरील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती मरण पावली तर त्याच्या नावाने एखाद्या दगडाला वा खांबाला शेंदूर लावून ठेवतात. त्याला वीर म्हणतात. काही आदिवासी जमातीत खंबदेव असतात ते याच प्रकारचे असतात.
 सुफलनशक्तीशी जोडलेली दैवते ही ग्रामदैवते -
 जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केल्या जाणाऱ्या विधी, सण, उत्सव यांच्याशी संबंधित दैवते ही ग्रामदैवते आहेत. या दैवतांशी संबंधित मूळ स्वरूपातील गाणी पूर्वी सामाजिकदृष्ट्या तळागाळातील स्तरावरचे मानल्या जाणाऱ्या समाजात अत्यंत श्रद्धेने गायिली जातात. धनगर, कुंभार, वसुदेव, महार, मांग आदी समाजात

५४
भूमी आणि स्त्री