पान:भूमी आणि स्त्री.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उगवलेल्या झाडाखाली राहतात. या देवता संहारकर्त्या असल्या तरी त्यांचे रूप संरक्षक बनविण्याची परंपरा भारतीय दैवतशास्त्रात सुरुवातीपासून आहे. सटवाई बाळाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिते अशी कल्पना आहे.
 सटवाई माये। बाभुळवनी नांद।
 आउखाचा नाडा बांध । बाळ माझ्या राजसाला ।।
 महाराष्ट्रात आषाढात बाभळी पूजण्याची प्रथा सर्व जातिजमातीत पाळली जाते. आषाढ तळण्याचाही रिवाज आहे.
 सर्वसाधारणपणे भूमातेचे रूप म्हणून पूजिल्या जाणाऱ्या देवतांची पूजा निमित्ताने होते. तात्पुरत्या केलेल्या मातीच्या मूर्ती वा खडे वा वनस्पती यांच्या रूपात ती होते. त्यांचे विसर्जन जलाशयात होते.
 सूर्य आणि पृथ्वी : आदिम युगल -
 ऋग्वेदात भूमीला महानग्नी म्हटले आहे. आणि पृथ्वीच्या सदैव वर असणारा देव म्हणजे सूर्य. 'अश्व' या शब्दाचा मूळ अर्थ व्यापनशील. व्यापनशील सूर्याचे प्रतीक म्हणजे अश्व. सूर्य आणि पृथ्वी हे आदिम सांकेतिक युगल आहे. अश्वमेघ यज्ञात अग्निमंथन करताना खालील आरणीत लाकडी दंडगोल ठेवून तो जोरजोरात हलवितात व अग्निरूपी शिशु निर्माण करतात. स्त्री पुरुष घर्षणातून नवनिर्मिती, शिशु वा फळ निर्मिती ही संकल्पना वैदिकांनीही महत्त्वाची मानली.१४सूर्य पृथ्वी यांचा हा उघडपणे पवित्र संबंध रोजच येत असतो. तो वर्षातून एकदा तरी अश्वमेध यज्ञाच्या रूपाने साजरा होत असावा. परंतु पुढे समाजाचे स्वरूप पालटले. राज्य आणि राजा ही शासनयंत्रणा आली आणि अश्वमेधाचे रूप पालटले.अश्वमेध यज्ञात स्त्री आणि अश्व यांच्या समागमाचे विधिनाट्य केले जाते. अश्व म्हणजे सूर्य आणि स्त्री वा राणी म्हणजे भूमी. सूर्य आणि भूमी संबंध आल्याने जमीन उत्तम रीतीने खणली जाते व सुपे भरभरुन फळे देते. मुळात जमिनीची पीक उत्पन्न करण्याची शक्ती वाढून तिला सफळ करण्यासाठी व गाईना भरपूर वेत येण्यासाठी हा सांकेतिक विधी असावा. विवाहापूर्वी वधूचे शुद्धीकरण करताना, महानग्नीचे जघन जसे शुद्ध केले तसे हिचेही करा असे अथर्ववेदात म्हटले आहे. महानग्नी ही खोदल्या जाणाऱ्या जमिनीची आणि सफळ होऊ घातलेल्या स्त्रीजातीचे प्रतीक आहे.

भूमी आणि स्त्री
४७