पान:भूमी आणि स्त्री.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुमारिकांना विशेष महत्त्व असते. नवरात्रात कुमारिकांची पूजा केली जाते. सवाष्णीबरोबर एक कुमारिका सन्मानित करण्याची परंपरा अनेक व्रतांतून असते.
 कुंभ : पृथ्वीचे प्रतीक -
 भूमीच्या सुफलन शक्तीच्या वृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या व्रतांत, दैवतांच्या पूजेत कुंभाला विशेष स्थान असते. भारतीय संस्कारात कुंभाचे स्थान महत्त्वाचे आहे. जन्म, विवाह, मृत्यू यांचेशी जोडलेल्या संस्कारात कुंभ महत्त्वाचा असतो. कुंभ ही संज्ञा पृथ्वीशी संबंधित आहे. कुं म्हणजे पृथ्वी. पृथ्वी द्रव्याने युक्त तो कुंभ. इळा आवसेला खास करून केली जाणारी आंबील विधिपूर्वक रंगवलेल्या मडक्यातून शेतात नेतात. भारतीय परंपरेत पूर्णकुंभ वा पूर्णघट या प्रतीकाला सर्जकता, समृद्धी आणि शुभता यांचा कारक असल्याची प्रतिष्ठा लाभली आहे. कुंभ हा मातृरूप.... भूमीरूप मानला जातो.
 जिवती : सर्जनशक्ती : जगन्माता-
 जगाची निर्मिती करणारी शक्ती. साक्षात सर्जनशक्ती ती जगन्माता. श्रावणात दर शुक्रवारी जिवंतिकेची पूजा केली जाते. जिवती हे भूमीचे सर्जक रूप आहे. अन्नधान्य, पशुसमृद्धी देणारी देवता गौरी आणि लक्ष्मी. दोघी एकरूपच आहेत. त्या अन्नसमृद्धी निर्माण करतात. त्या भूमातेचे रूप आहेत. विश्वाचा संहार करणारी ती रोग देवता. काली वा चंडिका. अर्थात् ही विश्वाचा संहार करणाऱ्या दृढ शक्तींचाही संहार करते. काली ही तिचे उन्नयन झालेले रूप आहे. मुळात महामाता निर्ऋती ही सर्जन आणि मरण दोहोंची देवता आहे. वैदिकांची धारणा होती की, या दोनहीं अदभुत घटनांचा तिच्या उदराशी संबंध आहे. त्यावर तिची अधिसत्ता आहे.
  'इयं पृथ्वी वै निर्ऋतीः'
 'पुनरषि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्।' ही सृष्टी मातृरूप आणि मृत्युरूप पृथ्वीच्या गर्भाशयात येरझारा घालीत राहते. तिचे सर्जक रूप गौरीच्या रूपात पूजिले जाते, तर संहारकरूप कालीच्या रूपात पूजिले जाते. या विविध रूपातील मातृपूजा जगाच्या पाठीवर प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे.
 भारतातील देवी उपासनेचे आद्य केंद्र सिंधू संस्कृती -
 भारतातील देवी उपासनेचे आद्य केन्द्र सिंधू संस्कृती हे होते. हा समाज देवी

भूमी आणि स्त्री
३९