पान:भूमी आणि स्त्री.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भूमीची पूजा -
 मानवी जीवनाचा विकास शेतीच्या जोडीने झाला. अन्न ही जीवनाची महत्त्वाची प्रेरणा होती. अन्न निर्माण करणाऱ्या भूमीची उपासना आणि पूजा प्राचीन कृषिजीवी समाजाने विविध रूपांतून केली. मृदुमुलायम रेणूंनी बनलेले वारूळ हे भूमीची योनी मानले जाते. रेणू म्हणजे मातीचा कण. मातीच्या कणांतून साकारलेली 'रेणुका' म्हणजे भूमी वा पृथ्वी. वारूळाच्या मातीला कोरी-भूमी म्हणजे कुमारी भूमी असे म्हटले जाते. वारूळाची माती अत्यंत सुफल असते अशी श्रद्धा आजही शेतकरी समाजात आहे.
 नवरात्रात वारूळाची माती दुसऱ्या मातीत मिसळून त्यात बीज पेरले जाते. पेरणीपूर्वी वारूळाची माती आणून ती शेतात शिंपडण्याचा रिवाज आहे. शेतातील वारूळे सहसा मोडीत नाहीत. वारूळात नाग राहतात. नाग हा भूमीचा रक्षक मानला जातो. नागपंचमीला वारूळाची म्हणजेच भूमीची पूजा केली जाते. भूमीची गर्भधारणेची आणि जीवनसर्जनाची अपार क्षमता ध्यानी घेऊन तिला 'उत्तानामही' या शब्दांनी गौरविले आहे. सर्जनाच्या सोहळ्यात साथीदार म्हणून पृथ्वीने पुरुषतत्त्वाला कधी सूर्य म्हणून, कधी अश्व म्हणून, कधी नाग म्हणून, कधी वृषभ म्हणून तर कधी गजाकार मेघ म्हणून स्वीकारले. भारतीय संस्कृतीने या क्षमेला आदिकालापासून वंदनीय मानले आहे. सकाळी उठल्यावर धरणीला पदस्पर्श करताना भारतीय मन सहजपणे म्हणते -
  समुद्रवसने पृथ्वी पर्वतःस्तन मंडले।
  विष्णुपत्नी नमःस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व में।
 भारतात, महाराष्ट्रात पृथ्वीची..... अनेक स्थाने आहे. माहूर झरी हे वाकाटक राजांच्या काळात मातृपूर आणि पृथ्वीपूर या नावाने प्रसिद्ध असून ते पृथ्वी मातेच्या अथवा रेणुकेच्या उपासनेचे जागते केंद्र होते. भारतभर नागपंचमीला नागपूजा केली जाते. मात्र महाराष्ट्रात नागपंचमीस शेतात जाऊन स्त्रिया वारूळाची सामूहिक पूजा करतात. नाग हा पुरुषतत्त्वाचा प्रतिनिधी आहे. मूळ पूजा भूमीचीच. गोव्यातील सांतेरी ही भूमिका या पर्यायी नावाने ओळखली जाते. वारूळाची माती सर्वात सुफल.... कोरीभूमी..... कुमारी भूमी मानतात. कुमारिका, जिच्यात बीज अद्याप पेरलेले नाही, ती सुफल होण्याच्या शक्तीने ओतप्रोत भारलेली असते ही श्रद्धा मानवी विकासक्रमात दृढ झाली. आज सुफलीकरणाशी जोडलेल्या व्रतांत

३८
भूमी आणि स्त्री