Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूर्याचे तेज आणि भूमीतील उर्वराशक्ती यांच्यावर आपण ताबा मिळवू शकत नाही हे त्याने अनुभवातून जाणले होते. कौटिल्याने त्याच्या ग्रंथात खतांचे विविध प्रकार वर्णिले आहेत. तरीही पेरणी समंत्रक करावी असे तो ठासून सांगतो.शेती हा व्यवसाय अन्नाशी, उपजीविकेशी जोडलेला आहे. आदिमानवाने अन्नाला अपार महत्त्व दिले. कारण ते त्यांचे जगणे होते. त्यामुळे हा व्यवसाय लोक संस्कृतीचा अंगभूत घटक आहे. आदिम काळात निर्माण झालेल्या श्रद्धा बदलत्या काळातही पूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीत. आज २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतीय कृषिसमाजात या श्रद्धेचे अस्तित्त्व विविध सण उत्सव विधी, व्रते तत्संबंधी गाणी यात दडले असल्याचे सतत जाणवत राहते.
 महाराष्ट्रातील भिल्ल, ठाकूर, पावरा आदिवासी जमाती पेरणीपूर्वी विधी करतात. शेतकरी समाजातही पेरणी, काढणीपूर्वी म्हसोबाला वा आसरांना मद्यमांसांचा नैवेद्य दिला जातो. किमान नारळ फोडला जातो. मंत्रतंत्रात्मक आचरण केले जाते. भारतातील नागर आणि ग्रामीण,उच्चवर्गीय समजल्या जाणाऱ्या समाजात श्रद्धापूर्वक साजऱ्या केल्या जाणाऱ्या गौरीगणपती, चैत्रगौर, हरितालिका, लक्ष्म्या, शाकंभरी नवरात्र, ऋषिपंचमी, चंपाषष्ठी आदी व्रतांचा संबंध वनस्पतीसृष्टीच्या सुफलीकरणाशी आहे. प्राचीन वाङ्मयात याला भरपूर आधार सापडतात.
 सुफलीकरणाशी निगडित दैवते -
 सुफलीकरणाशी संबंधित विधीव्रते सण उत्सव यांचे शोधन करताना त्यांच्याशी निगडित दैवतांचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. ही दैवते का, कशी व केव्हा निर्माण झाली, त्यांच्यात काळानुरूप कसे बदल घडत गेले ते का घडत गेले, या बाबींचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
 भारतात दास, दस्यु, पणिन्, द्रविड, आर्य, असुर आदी अनेक टोळ्या स्थिरावल्या. भारतात स्थिर झालेल्या सर्वच समाजांना रानटी अवस्थेचा भूतकाळ होता. त्यांचे स्वतःचे असे आचार विचार होते. दैवतकल्पना होत्या. अर्थात हे सर्व प्राथमिक स्वरूपात होते. त्यातून पुढे वैदिक आणि लोक या संस्कृती निर्माण झाल्या. सर्वांच्या संयोगातून एक वैविध्यपूर्ण, आगळीवेगळी परंतु एकसंध अशी भारतीय संस्कृती निर्माण झाली. सुफलीकरणाशी निगडित अशी व्रते, विधी, आचार, दैवते, उत्सव यांचे दर्शन आजही या संस्कृतीतून आपल्याला दृगोचर होते. भारतीय समाज

३६
भूमी आणि स्त्री