पान:भूमी आणि स्त्री.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घडतात, त्याचा कर्ता करविता कोणी तरी असला पाहिजे. मानवाच्या संपूर्ण व्यवहारावर नियंत्रण ठेवणारी, चराचरावर स्वामित्त्व गाजविणारी एक अद्भुत आणि विराट अशी शक्ती असली पाहिजे अशी प्रगाढ श्रद्धा त्याच्या मनात आकारली. मुळात मानवी प्रवृत्ती समन्वय साधण्याची. त्यामुळे या दिव्य शक्तीशी तडजोड साधली पाहिजे असे त्याला वाटू लागले आणि त्यातूनच धर्म ही संकल्पना उदयाला आली.
 प्रोफेसर बॅलार्ड म्हणतात -
 Religion is a process of adjustment to the intangible, unseen, unknown and uncontrolled forces believed to be present in social situation.
 अशी ही धर्मसंकल्पना निर्माण होण्यापूर्वीची अवस्था ही यातुश्रद्धेची (Magical faith) होती. यातुश्रद्धा ही मानवी संस्कृतीच्या आदिपर्वातील समूहश्रद्धा आहे. या समग्र सृष्टीत एक यातु (जादू).... एक अनाकलनीय शक्ती व्यापून राहिली आहे. समूहाने विशिष्ट पद्धतीने या शक्तीस आव्हान केले तर, ती शक्ती, ते द्रव्य शरीराश्रयी होऊन इष्ट कार्य घडवून आणते, अशी आदिकालीन समूहमनाची ठाम श्रद्धा होती. तो काळ असा होता की ज्यात 'मी' जन्माला आलेला नव्हता.
  संगच्छध्वं, संवदध्वं, सं वो मनांसि जानताम्
  देवा भागं यथापूर्वे संजनाना उपासते॥
  समानी व आकूती समाना हृदयानिव
  समानमस्तु वो मनो यथा वा सुसहासती....! (१०.१९१.२-४)
ही समूह भावना व्यक्ती मनातून होती. समूह कर्मातून निर्माण होणारा भावनात्मक आवेग यात्वात्मक विधीच्या यशस्वितेचे कारण असावा असे आदिमानवास वाटत असावे.
 शेतीशी जोडलेल्या आदिम श्रद्धा आजही मनातून जाग्या -
 शेतीच्या विकासाबरोबर शेतीतून अधिकाधिक पीक काढण्यासाठी त्याने तंत्र विकसित केले. पाण्याचा योग्य वापर व विविध प्रकारची खते वापरल्यास शेतात भरपूर पीक येते हे त्यांच्या लक्षात आले होते. तरीही वेळेवर पडणारा पाऊस,

भूमी आणि स्त्री
३५