Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'सुफलीकरण' संकल्पनेशी निगडित लोकदेवतांचा शोध घेण्यापूर्वी ही लोकदैवते ज्या कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात त्यामागील परंपरेचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरेल. भाषेचा शोध लागल्यानंतर माणूस स्वतःला अभिव्यक्त करू लागला. त्यातूनच त्याला ज्या नैसर्गिक घडामोडींबद्दल विलक्षण आणि अपार कुतुहल होते, त्यांचे वर्णन.... व्याख्या करण्यास समर्थ झाला आणि हे वर्णन आणि व्याख्या 'दैवतकथां' च्या रूपात व्यक्त झाल्या. ऐण्ड्रयूलँग च्या मते दैवतकथांमधून मानवी विकासाच्या इतिहासाचा आलेख कळतो. किंबहुना तो मानवी विकासाचा इतिहासच आहे.
 जेव्हा प्राचीन जीवनव्यवस्था वा धर्म जीर्णशीर्ण होऊन, नवीन नियमांवर आधारित धर्म त्याची जागा घेऊ लागतो तेव्हा आदिम दैवतकथा या परिकथा आणि दन्तकथा बनतात. सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या दैवतकथा सृष्टिउत्पत्ती, नक्षत्रे यांच्याशी संबंधित आहेत.
 अन्न ही मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची समस्या आणि गरज होती. अन्नाची निर्मिती सृष्टीतून...धरणीतून होते. तर त्या निर्मितीसाठी पाऊस आवश्यक. तसेच सूर्याची ऊर्जा जीवनावश्यक. त्यामुळे या तीन निसर्ग शक्तींवरील दैवतकथा आधिक्याने आहेत. या संदर्भात भारतीय लोकसाहित्याच्या मान्यवर अभ्यासक दुर्गा भागवत म्हणतात, अतिप्राचीन नक्षत्रकथांचा शोध घेताना असे लक्षात येते की जगात 'कृत्तिका' या वर्षाऋतुशी निगडित नक्षत्राच्या कथाच उपलब्ध आहेत. वर्षनाशिवाय सर्जन संभवत नाही याची खात्री आदिमलोकसमूहाला झाली होती. हे यातून लक्षात येते.
 आदिमानवाची यातुश्रद्धा समूह जीवनातून -
 जीवननिर्वाहासाठी सातत्याने झगडणारा माणूस बदलत्या परिस्थितीशी जुळवून , घेत होता. विविध तऱ्हेचे शोध लावून त्याने निसर्गातील शक्तींवर मात करण्याचा सतत प्रयत्न केला. शत्रूवर मात करण्यासाठी अधिकाधिक वेगवान आणि तीक्ष्ण हत्यारे, रोगांवर मात करणारी औषधे इत्यादी नवनवीन शोध त्याने लावले. मात्र निसर्गावर पूर्ण ताबा मिळविणे त्याला शक्य झाले नाही. अनपेक्षित अशा संकटांनी तो चक्रावून जाई. या सर्वांचे निरीक्षण करून त्याची दृढ श्रद्धा झाली की, मानवी जीवनात आणि निसर्गात ज्या अनपेक्षित, अनाकलनीय, संहारक वा सुखकर घटना

३४
भूमी आणि स्त्री