Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुलनात्मक पाहणी, तसेच मराठवाड्यातील पाहणीशी उर्वरित महाराष्ट्रातील समानधर्मी लोकपरंपरांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
 अनुबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न -
 जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात साजरे होणारे विधी, सण, व्रते, उत्सव, तत्संबंधी गाणी आदींचे शोधन करून भारतातील उर्वरित प्रांतांतून याच भूमिकेतून साजऱ्या होणारे विधी, सण, उत्सव, व्रते, तत्संबंधी गाणी यांच्यातील अनुबंध शोधण्याचा प्रयत्न या प्रबंधाद्वारे केला जात आहे.
 या शोधामागील भूमिका -
 लोकसाहित्य ही एक स्वतंत्र अभ्यास शाखा आहे. ती समन्वित (Interdisciplinary) आहे. लोकसंस्कृतीशी जोडलेल्या विषयांचा अभ्यास करताना लोकपरंपरेतील सर्व मौखिक वाङ्मय (कथा,गीते, म्हणी, उखाणे इत्यादी) धर्मश्रद्धा, विधी विधाने, लोकभ्रम, रूढी, चालीरीती आदी सर्व घटकांचा त्यात समावेश करावा लागतो. आणि या अभ्यासाला प्रसंगपरत्वे मानववंशशास्त्र, इतिहास, पुरातत्वशास्त्र, भूगोल, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र आदी शास्त्रांची मदत घ्यावी लागते. लोकसाहित्याबद्दलची - Folklore संबंधीची ही व्यापक भूमिका घेऊन हा शोधनिबंध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
 २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारताला विघटित करणाऱ्या विविध शक्ती बळावत आहेत. अशा वेळी भारतातील अन्नधान्य समृद्धीशी जोडलेल्या विधी व्रतादींमधून जाणवणाऱ्या प्राणभूत एकात्मतेचा शोधघेणे अपरंपार महत्त्वाचे ठरते. भाषा हे एक आत्मप्रगटीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. परस्पर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषा बोलता येणे, त्यांचे ज्ञान असणे हे विद्वत्तेचे गमक मानले जाते.
 साहित्य, मग ते कोणत्याही भाषेतील असो, समकालीन असो वा लोकसाहित्य असो. साहित्याचा आत्मा एकच. मानवी मनाचे परस्पर भावबंधाचे ते प्रकटन असते. या भाषेविषयींच्या मूलबंधातून आजवर विविध भाषांमधील सामंजस्य जपले गेले. आज मात्र भाषेच्या आधाराने देशाच्या विघटनाचे खेळ मांडले जात आहेत. या भूमीत वाढलेल्या रूजलेल्या विविध धर्मानी, पंथांनी एकमेकांचा सामंजस्याने

३०
भूमी आणि स्त्री