पान:भूमी आणि स्त्री.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि पश्चिम महाराष्ट्रात हस्तनक्षत्राचे सोळा दिवस खेळल्याव मांडल्या जाणाऱ्या हादगा, या कुमारिकांच्या खेळोत्सवावर टिपण लिहिले. गाणी संकलित करून गाण्यांतील शब्दांचा शोध घेतला. मराठी लोकसाहित्याचा आणि लोकपरंपरांचा चिकित्सक आणि मूलभूत दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची, विश्वात्मक आणि तुलनात्मक दृष्टीने या परंपरेचा शोध घेण्याची दिशामहाराष्ट्रातील विदुषी मा.दुर्गाताई भागवत यांनी दिली. पुण्याचे डॉ. रा. चिं. ढेरे, मराठवाड्यातील डॉ. प्रभाकर मांडे, खानदेशातील दा. गो. बोरसे, विदर्भातील भाऊ मांडवकर, डॉ. मधुकर वाकोडे, सांगलीच्या डॉ.तारा भवाळकर, नांदेडच्या डॉ.तारा परांजपे, अहमदनगरचे डॉ. गंगाधर मोरजे यांनी ही परंपरा परिपुष्ट केली. लोकसंचिताच्या अभ्यासाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लोकसाहित्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सरोजिनी बाबर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक लोकसाहित्य गोळा करून, अस्सल रूपात संग्रहित करून लोकसाहित्य मंडळामार्फत प्रकाशित केले. अभ्यासासाठी संदर्भ साहित्याचा फार मोठा ठेवा उपलब्ध करून दिला. अनुताई लिमये यांनी लोकगीतांचे संकलन खेड्यापाड्यांत हिंडून केले. सानेगुरूजींनी लोकसाहित्याचे मोल ओळखले होते. आज विधी, विधिगीते, ग्रामपरंपरा, ग्रामदेवता, लोककथांचे, लोकगीतांचे विविध प्रकार, विधी-नाट्य, अभिजात वाङ्मयातून घडणारे लोकसाहित्याचे दर्शन आदी अनेकविध विषयांवर सापेक्ष पद्धतीने विचार करण्याची वृत्ती विकसित होत आहे.
 कृषिलक्ष्मीशी जोडलेले रीतिरिवाज आजही हरवलेले नाहीत -
 मानवी संस्कृतीच्या प्रथमावस्थेत कृषिजीवी समाजाने जमिनीची सुफलन शक्ती वाढावी, धनधान्य समृद्धी विपुल प्रमाणात निर्माण व्हावी यासाठी जे विधी, उत्सव, व्रते, सण, रीतीरिवाज निर्माण केले. ते आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतीयांच्या कृषिजीवनातून हरवलेले नाहीत. भूमीची सृजनशक्ती, आकाशातून बरसणारी वर्षनशक्ती, सूर्यापासून मिळणारे तेजोमय चैतन्य या तिन्हीच्या सहयोगातून निर्माण होणारी कृषिलक्ष्मी या सर्वांबद्दलची जवळीक आणि कृतज्ञता, त्या त्या ऋतूंचे संदर्भ, आकाशातील ताऱ्यांची नक्षत्रांची बदलती स्थाने त्यांच्या गणितावर आधारलेल्या लोकपरंपरांतून जाणवते. त्यातील एकात्मतेचा चिकित्सक नजरेने शोध घेण्याची भूमिका या अभ्यासामागे आहे. या लोकपरंपरा केवळ महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नसून त्या सर्व भारतभर आढळतात. त्यांची

भूमी आणि स्त्री
२९