पान:भूमी आणि स्त्री.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यातुविधींच्या खुणा आढळतात. या खुणांच्या साहाय्याने भारतातील लोकधर्मी संस्कृतीतील प्राणभूत एकात्मतेचा शोध घ्यायचा असेल तर, लोकपंरपरांचे चिकित्सक दृष्टीने निरीक्षण करणे आवश्यक ठरते.
 लोकपरंपरा आणि समूहमन -
 लोकपरंपरेच्या अभ्यासातून प्राचीन काळातील जनसामान्यांच्या जीवनरीतीचा, समूहमनाचा, त्यांच्या मूलभूत भूमिकेचा शोध घेता येतो. लोककथा, लोकगीते आदी लोकसाहित्याची निर्मिती करणारी एक व्यक्ती नसते, विशिष्ट काळ नसतो. ही निर्मिती समष्टीने केलेली असते. त्यात असंख्य अनामिकांनी वेळोवेळी भर घातलेली असते. या वाङ्मयात त्या त्या काळचा ठसा नकळत उमटलेला असतो. लोकसमूहाच्या जगण्याच्या रीतीचा इतिहासच जणु त्यांत नोंदविलेला-गोंदविलेला असतो.
 लोकपरंपरा आणि लोकसाहित्याचा अभ्यास : प्रेरणा-
 लोकपरंपरा आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाची प्रेरणा गेल्या दीडशे वर्षांपासूनची आहे. कवी रविन्द्रनाथ टागोरांनी जनसामान्यांच्या ओठात आणि हृदयांत परंपरेने गोंदविलेल्या लोकगीतांचा, लोकनाट्याचा, तसेच लोकसंगीतांचा जाणीवपूर्वक अभ्यास करण्याचा पायंडा घातला. जात्रा, कविगान, कीर्तन, पांचाली, कथाकली यांसारख्या लोककलांतून सरलपणे व्यक्त होणाऱ्या आविष्कारांचा शोधक दृष्टीतून सन्मान केला. त्यातील स्वयंभू सौंदर्य समाजासमोर ठेवले. लोककलांतील समूह मनाची शक्ती त्यांना जाणवली होती. रविबाबूंच्या काव्याचा आत्मा लोकसंस्कृतीच्या अभिजातरंगाने रंगला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
 महाराष्ट्रात वि.का. राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वी लोकगीते व लोकपरंपरांचा चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची परंपरा निर्माण केली. भाद्रपद, आश्विनात, हस्त नक्षत्राच्या काळात खेळल्या जाणाऱ्या भोंडला वा हादगा या कुमारिकांच्या उत्सवाचा आणि त्या निमित्ताने गायल्या जाणाऱ्या पारंपरिक लोकगीतांचा शोधक अभ्यास केला. त्यानंतर लोकसाहित्याच्या अभ्यासाची परंपरा निर्माण झाली. अनंत आबाजी देवधरांनी वऱ्हाड...खानदेशात भाद्रपद पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत.... कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मांडल्या जाणान्या भुलाबाईवर

२८
भूमी आणि स्त्री