पान:भूमी आणि स्त्री.pdf/३२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मांडणा म्हणतात. तो वर्तुळाकार वा चौकोनाधिष्टित असतो. शुभता, पावित्र्य यांचे ते प्रतीक असते. मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश विशेष करून राजस्थान परिसरात मांड हा लोकगीत प्रकार परंपरेने गायला जातो. त्यातील स्वरांत भौगोलिक, प्राकृतिक, नैसर्गिक वातावरणाचे प्रतिबिंब पडलेले असते. भारतीय संगीतान्वे कालौघात, या निर्गाशी एकरूप असलेल्या पारंपारिक लोकगीत गायकीला 'राग' म्हणून स्वीकारले आहे.
मांड म्हणजे निश्चित मांडणी. गोमांतकाच्या सांस्कृतिक जीवनात 'मांड' या संकल्पनेला महत्त्व आहे. तेथील लोकजीवनाच्या भावाविष्कारासाची, कोणाच्याही मालकीची नसलेली, सांस्कृतिक कार्यासाठी वापरली जाणारी ती शुभकारक जागा असते. 'मंडल' या शब्दाशी साम्य. बंगालातील दुर्गापूजेचे वेळी काढण्यात येणाऱ्या पारंपारिक रांगोळीस 'भद्रमंडलम' म्हणतात.

 २. उत्सव : भारतीय संस्कृतिकोश खंड १ पृ. ६३४-३५.

संसारग्रस्त मानवाला दैनंदिन चिंता, व्यथा, व्यवहारातून बाजूला काढून त्याच्या शरीराला, मनाला आनंदाचा अनुभव मिळवून देणे व सामाजिक सुखाचा अनुभव घडविणे हा उत्सवाचा हेतू असतो. ऋग्वेदात सामूहिक उत्सवांना 'समन' म्हणत. कवी वाल्मिकींनी अयोध्येचे वर्णन करताना 'समाजोत्सवशालिनी' या शब्दात तिचे वर्णन केले आहे.

 ३. व्रत : भारतीय संस्कृतिकोश खंड ९ पृ. १६४-६८.

अन्नं न निन्द्यात् । तद् व्रतम् । अन्नं बहु कुर्वीत । तद् व्रतम् ।
न कञ्चन वसतौ प्रत्याचक्षीत । तद् व्रतम् ।। तै. उ. ३.७.१०)

अन्नाची निंदा करू नये. ते एक व्रत आहे. अन्न पुष्कळ निर्माण करावे. ते एक व्रत आहे. अतिथी आश्रय मागण्यास येईल त्याला रहाण्यास मनाई करू नये. त एक व्रत आहे.

भूमी आणि स्त्री
३१७