पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानली. जीवन प्रेरणा मानली. पुरुषाच्या सहभागाशिवाय 'योनी' ला चेतना मिळत नाही हे लक्षात येताच 'लिंग'पूजा सुरू झाली. लिंगयोनी-पूजा धर्माधिष्टित नव्हत्या. त्या 'विधि'स्वरूप होत्या. विश्वात अद्भुत शक्ती असून, ती रसमय आहे, ती प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत असते, विशेषतः स्त्रीत अधिक्याने असते अशी आदिमानवाची धारणा होती. यातुशक्तीच्या साहाय्याने सृष्टीचे नियंत्रण करता येते, या श्रद्धेतून पाऊस पडावा, जमिनीतून भरपूर धान्य यावे, त्यावरची रोगराई दूर व्हावी, यासाठी त्याने 'विधी' निर्माण केले. हे विधी सर्जनक्षमता असलेल्या स्त्रीच्या माध्यमातून केले जात. त्यांचेच कालौघात व्रतांत रूपान्तर झाले.
 शेतीचा शोध स्त्रीने लावला, आणि जो समाज शेतीवर अवलंबून असतो तो मातृप्रधान असतो, या बाबी जगन्मान्य आहेत. भारतातही मातृसत्ताक समाजव्यवस्था होती. याचे संकेत या विधिउत्सवांतून मिळतात. त्यांचा उहापोह प्रस्तुत प्रबंधात केला आहे.
 सुफलीकरणाशी निगडित देवता या 'लोकदेवता' आहेत. त्या वृक्षरूपी, नदीरूपी, माती,दगड या रूपात पूजिल्या जातात. या लोकदेवतांचे मूलबंध शोधण्यासाठी लोकजीवनाचे रूप न्याहाळावे लागते. 'असु' म्हणजे जादू, वा यातुशक्ती. ती ज्यांच्यात अधिक्याने असते ते असुर. रावण, विश्वकर्मा, वरुण हे असुर होते. दलितांत धर्मा, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन इत्यादी नावे ठेवली जातात. त्याच बरोबर वनात निसर्गाच्या सानिध्यात अधिक नैसर्गिक व अनौपचारिक जीवन जगणाऱ्या आदिवासींमध्ये रावण, बिभीषण इत्यादी नावे ठेवली जातात. वृक्षवेलींची नावे ही विपुल आढळतात.
 भारतीय जीवनराहाटीत या समाजांचे असलेले महत्त्व आणि योगदान आदींचा अभ्यास सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आज केला जात आहे. त्यासाठी 'लोकभूमी' च्या खोलात जाऊन शोध घेतला जात आहे.
 स्त्री आणि शेती यांच्यातील प्राणभूत नाते सुफलन विधिउत्सवांतून सतत जाणवत असे. या नात्याचा शोध घ्यावा, या नात्याच्या बुडाशी असलेले तिच्या सबलत्वाचे संकेत शोधावेत आणि कालप्रवाहात 'निर्बल देहस्विनी' झालेल्या स्त्रीला, भारतीय जीवनरहाटीच्या मध्यवर्ती प्रवाहात आणून, तिला 'सबल

भूमी आणि स्त्री
३०३