पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भूमीच्या सुफलनाशी निगडित विधिव्रतामधून असलेला स्त्रियांचा सहभाग सजग झाला, त्यामागील तिच्या कर्तृत्वाची, ती आणि भूमी यांच्यातील सकारात्मक अनुबंधाची जाणीव तिला झाली तर सामान्य भारतीय स्त्रीला आत्मभान येऊ शकते. या व्रतांचा ती नव्या संदर्भात आणि नव्या भूमिकेतून विचार करू शकते. त्यामुळे या व्रतात आलेली निर्ममता, औपचारिकता, कचकडीपणा नाहीसा होईल. आज ही व्रते 'रीत' म्हणून 'देवाचे केले नाही तर अरिष्ट कोसळेल' या भीतीतून केली जातात. या विधीत स्त्रीचे अहेवपण महत्त्वाचे झाले. त्यामुळे प्रत्यक्ष श्रम करणारी स्त्री या विधिउत्सवांपासून दूर ठेवली गेली.
 या विधिउत्सवामध्ये परिवर्तन घडविणाऱ्या, या व्रतातील सामूहिकता जागवून ती समाजोपयोगी करण्याचा प्रयत्न काही सुशिक्षित महिलांनी केला. उदा. संक्रान्तीच्या हळदीकुंकवाच्या वेळी वाटायचे वाण न वाटता ते पैसे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना देणे वगैरे, पण तो प्रयत्न वरवरचा होता. भूमीच्या सुफलनाशी जोडलेले विधिउत्सव भारतातील सर्व स्तरांतील स्त्रिया श्रद्धेने आचरतात. या विधिउत्सवांचा अभ्यास करून त्यांना स्त्रियांच्या सबलीकरणासाठी सकारात्मक रूप देता येते. तसा प्रयत्न सामूहिकपणे व्हायला हवा. लोकमान्य टिळकानी गणेशचतुर्थीचे सकारात्मक रूप जनसामान्यांत रुजवले. त्या वळणाचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 ऱ्हेनफेलच्या मते सर्वात प्रभावी मातृसत्ता भारतातच होती. गेल्या ३/४ हजार वर्षांपासून तिला मुळापासून उखडण्याचा सतत प्रयत्न झाला. त्याचा आढावा यापूर्वी घेतला आहेच. असे असूनही भारतीय सामाजिक, सांस्कृतिक जीवनात तिच्या अस्तित्वाचे अवशेष विधिउत्सवांच्या माध्यमातून विशेष करून सुफलन विधिउत्सवांच्या माध्यमातून संकेत रूपाने टिकून आहेत. मातृसत्ताक जीवनव्यवस्था नष्ट करण्यासाठी तीन कठोर उपाय वापरले. बालविवाह, बहुपत्निकत्व आणि सतीची चाल. हे उपाय हजारो वर्षांपासून वापरले जात आहेत. त्यामुळे भारतीय स्त्रीत्वातील शक्ती निस्तेज झाली आहे. ते दुर्बळ, अंधश्रद्ध, तर्क विचार यांपासून दूर गेलेले, गतानुगतिक बनले आहे. स्त्रीतत्वाला आत्मभान देऊन

भूमी आणि स्त्री
२९९