पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्णाच्या स्त्रियांनी कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाशी विवाहसंबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा झाला. या संदर्भातील विवेचन यापूर्वी केले आहे. स्त्रिया आणि कृषिविधान यांचे आंतरिक दृढ नाते असल्याने त्या, ज्या ज्या वर्णात गेल्या, त्या त्या ठिकाणी सुफलता विधींबद्दलचे 'आदिबंध' त्यांनी नेले. सुफलन विधींतील यातुश्रद्धा , विधी, सामूहिक कृतिशीलता, सामूहिक नृत्य आणि मंत्रगीते यांच्यात बदल होऊन त्यांचे रूपान्तर व्रते, उत्सव, सण यांत झाले. त्यांच्यातील स्त्रीप्रधानता मात्र कायम राहिली. गेल्या दोन हजार वर्षांपासून भारताच्या एकूण समाज जीवनावर वैदिक परंपरेचा प्रभाव दिसतो. परंतु या परंपरेने पूर्व वैदिक परंपरेत निर्माण झालेल्या कृषिसंबंधित यातुश्रद्धा, सण, विधी, व्रते, उत्सव यांच्या माध्यमातून स्वीकारल्या. धार्मिक अधिष्ठानात त्यांना महत्त्वाचे स्थान दिले. गौरीगणपती - मराठवाड्यातील लक्ष्म्या, हरतालिका, नवरात्र, घटस्थापना, भोंडला, भुलाबाई भराडीगौर आदी कुमारिकांचे खेळोत्सव, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी आदी व्रतांचा वैदिक धर्म संस्कृतीशी काहीही संबंध नाही हे सण हे सर्व विधी, उत्सव, वनस्पती सृष्टीच्या सुफलीकरणाचे आहेत.
 दुर्गापूजा : घट बसवणे -
 वरील सर्वच व्रते स्त्रीप्रधान आहेत. महाराष्ट्र मराठवाड्यातील श्रावण, भाद्रपदातील सर्व व्रतांचा सूक्ष्मपणे अभ्यास केल्यास त्यातील स्त्रीमाहात्म्य आणि त्यातील स्त्री आणि भूमी यांच्या सुफलीकरण विधीचे रहस्य सहजपणे लक्षात येते. दुर्गापूर येथील दुर्गापूजा पूर्वी 'पूर्ण घट' रूपानेच केली जाई. देवीप्रसाद चटोपाध्यायांनी त्या विधीचे सविस्तर वर्णन केले आहे. मातीच्या चौकोनी सपाट ओट्यावर पाच प्रकारची धान्ये पसरून त्यावर जलाने भरलेला मृत्तिका घट ठेवतात. घटाच्या मुखावर पाच प्रकारच्या वनस्पतींची पाने ठेवून त्यावर असोला नारळ ठेवतात. घटावर लहान मुलांची कुंकवाने आकृती काढतात. नारळाला कुंकू लावतात. हा पूर्ण घट ज्या मृत्तिकेवर ठेवतात त्यावर श्रीयंत्राची आकृती काढतात. या आकृतीला 'सर्वतो भद्र मंडलम्' असे नाव आहे. यापूर्वी स्त्री व्रतांची चर्चा करताना कोकणस्थ ब्राह्मणात बोडण भरतात. त्याची विस्तृत माहिती दिली आहे. बोडणाच्या परातीखाली वा समोर विशिष्ट प्रकारची रांगोळी काढतात. पारंपरिक

२९६
भूमी आणि स्त्री