पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे म्हणत खेळतात. त्यातून पाणी कसे वाढते ते क्रियेद्वारे अभिनित करतात आणि हा खळ पावसाच्या सुरुवातीसच अदिक्याने खेळला जातो. झिम्मा, फुगडी, कोंबडा हे सारेच खेळ स्त्रियांचे आणि कृषिसंबंधीचे आहेत.
 भारतातील देवी संप्रदायात'स्त्री' ला अत्यन्त महत्त्व आहे. महाराष्ट्रातील देवी उपासनेचे अवलोकन केल्यास स्त्रीमाहात्म्य लक्षात येते. नवरात्रात अष्टमीला स्त्रियांच्या अंगात येते. त्यांना प्रश्न, शकुन विचारतात. सप्तमातृकांची पूजा कर्नाटक, तामिळनाडू, आंध्राप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर होते. मराठवाडा परिसरात योगेश्वरी, तुळजाभवानी, माहूरची रेणुका महत्त्वाची देवींची ठाणी आहेत. पृथ्वीची प्रतीके म्हणून अनंत अशा लौकिक ग्रामदेवता गावोगाव पूजिल्या जातात.
 वामाचार : मधुरा भक्ती -
 पुरुषप्रधान संस्कृतीने मातृसत्ताक संस्कृतीची जागा घेतली तेव्हा हळूहळू धार्मिक विधी पुरुषांकडे आले. परंतु स्त्रियांच्या या क्षेत्रात पाऊल टाकताना पुरुषांना 'स्त्री' होऊन यावे लागे. आशिया मायनरमधील सिबिल देवतेचे पुजारी पौरूषाचे खच्चीकरण करूनच पुजारी होऊ शकत. महाराष्ट्रात दक्षिण भारतात यल्लमाचे पुजारी चोळीलुगडे परिधान करून मळवट भरतात. माहूर तुळजापुरचे देवी भक्त 'भुत्या' केस वाढवून, चोळीलुगडे घालतात. सुरुवातीस जगभर पौरूषाचे खच्चीकरण करून देवीचे पुजारीपण दिले जाई. पुढे कालौघात स्त्रीवेष करून स्त्रीत्व प्राप्त होते असा समज रूढ झाला.
 रामकृष्ण परमहंसांनीही स्त्रीवेश धारण करून देवीची उपासना केल्याचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. स्त्रीच्या भावात्म रूपात परमेश्वराची आळवणी करणारा संप्रदाय भारतातही होता. नाथपंथीय संस्कारांत वाढलेले कवी ज्ञानदेव परमेश्वराशी एकरूप होताना राधावृत्ती धारण करतात.

चंदनाची चोळी माझे अंगअंग जाळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा गा...
दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले
बाप रखुमादेवीसमोर मज ऐसे केले...

भूमी आणि स्त्री
२८९