पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उन्नयन झाले. काही देवतांचे एकत्रीकरण होऊन त्यांचे नवे स्वरूप समाजात स्थिर झाले. पूजनीय झाले. आर्यपूर्वांची देवता रूद्र, सिंधु- संस्कृतीत पूजनीय असलेला लिंगस्वरूपी शिश्नदेव, यांच्यातून आजची शिव ऊर्फ शंकर देवता साकारली. मात्र या पूजनीय देवतांचा जन्म स्वयंभू, अयोनिज मानला गेला. सीता नांगराच्या फाळातून तर द्रौपदी यज्ञाच्या वेदीतून निर्माण झाल्या. जी योनी सर्जनाचे उगमस्थान म्हणून सन्माननीय मानली गेली ती पाळीच्या काळात, रजोदर्शनाच्या काळात अपवित्र होते असे मानले जाऊ लागले. जिच्यात यातुशक्ती असते अशी श्रद्धा होती, विश्व सर्जनाची देवता म्हणून पुरातन काळापासून जिची उपासना केली जाई, जिच्यातील सुफलनशक्ती जीवनाला चैतन्य देते, जीवनाचे चक्र प्रवाहित ठेवते अशी धारणा होती त्या योनीरूप देवतेची प्रतिष्ठा समाजातून हळूहळू कमी होत गेली.
 विश्वाचा विस्तार, त्यात सातत्याने होणारे परिवर्तन हा कुतुहलाचा प्रश्न मानवी मनासमोर आदिम काळापासून होता, आहे आणि पुढेही राहील. आपल्या बुद्धीनुसार आणि अनुभवानुसार या विश्वाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न तो सातत्याने करीत आहे. कधी कधी ही उत्तरे आपल्याला सापडली असे त्यास वाटते. लिंगपूजा हे जगाच्या प्राथमिक अवस्थेतील माणसाने जगाचे कोडे सोडविण्याच्या प्रयत्नात शोधलेले एक उत्तर आहे. ज्या क्रियेतून यच्चयावत् प्राणिमात्रांची उत्पत्ती होते त्या मैथुनक्रियेला आदिममाणसाने गर्ह्य मानले नाही.जननेंद्रियाला घृणास्पद वा वासनेने लडबडलेले इन्द्रिय मानले नाही. जगत् निर्माण करणाऱ्या सृजनाची प्रेरणा असणाऱ्या जगत्-पितरांची लिंग व योनीच्या स्वरूपात त्याने पूजा केली. महाशाक्त कवी कालिदासाच्या शब्दात सांगायचे तर असे -

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये।
जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ ॥

 शिवलिंग हे योनी व लिंग यांच्या संपृक्ततेचे..... एकात्मतेचे प्रतीक आहे. ते आजही सन्मानपूर्वक पूजिले जाते. शिवलिंग हे सुफलतेचे प्रतीक आहे. हा मूलबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

२४
भूमी आणि स्त्री