पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक परिवर्तनामागची कारण परंपरा जाणता येते. माणसाची अंतःसृष्टी स्वयंभू नसते. दैवत कल्पना वास्तवातून आकारलेल्या असतात. त्यामुळे दैवत परिवर्तनाचा इतिहास हा मानवाच्या सामाजिक परिवर्तनाचे संकेत देणारा असतो. असे म्हटले जाते की, 'Gods are born in the minds of men.' दैवत कल्पना, त्याच्याशी निगडित श्रद्धा,कर्मकांडे, तत्त्वचिंतन या सर्वांचा जन्म मानवाच्या भौतिक जीवनानुभवातून होत असतो. माणसाच्या सामाजिक संघटनेचा आधार आर्थिक जीवनात आढळतो. आर्थिक संघटनेचे स्वरूप पालटले की समाज संघटनेतही परिवर्तन होते. मानवी जीवनाचा पाया, त्याची भौतिक - आर्थिक संघटना आहे. या संघटनेत मूलभूत परिवर्तन होताच त्याच्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कल्पना विश्वाला नवा आकार मिळतो.
 त्या त्या लोकसमूहाचे दैवत विकल्पन आणी तत्त्व चिंतन यांचा त्या लोकजीवनाच्या सामाजिक - आर्थिक जीवनाशी अतूट असा आंतरिक संबंध असतो. मानवाची अंतःसृष्टी त्याच्या भौतिक जीवनाच्या संघटनेतून विकास पावत असते. या भूमिकतेन भूमीच्या सुफलतेशी संबंधित उत्सवात स्त्रीप्रधानता का आहे याचा शोध घेता येईल. त्या दृष्टीने भारतातील मातृदेवतांची संकल्पना कोणत्या समाजिक संघटनेत आकारली, त्याचा आर्थिक आधार काय होता, वैदिक आर्यांचा या मातृदेवतांशी केव्हा व कसा संबंध आला, वैदिक आर्याहून भिन्न अशा या दैवत विकल्पनाचा भारतीय समाजावर त्यांच्या जीवनचिंतनावर, कोणता परिणाम झाला, भारतीय संस्कृतीवर या दैवतविकल्पनाचा काय परिणाम झाला याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
 आजची हिंदूसंस्कृती संमिश्र -
 गेल्या दोन तीन हजार वर्षांपासून भारतातील वरिष्ठ वर्णीयांच्या जीवनावर वैदिक आर्यांच्या संस्कृतीचा आणि तत्त्वचिंतनाचा घनदाट प्रभाव आहे. असे असले तरी लोक जीवनात आणि वरिष्ठ वर्णीयांच्या विधिउत्सवांत या अवैदिक मातृदेवंताचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. आजची हिंदू संस्कृती वैदिक आर्यांची एकसंध अशी संस्कृती राहिलेली नाही. तत्त्वचिंतनावर वैदिक आर्यांचा प्रभाव असला तरी विविध आचारविचारांची, श्रद्धांची , कर्मकांडांची संमिश्र अशी

भूमी आणि स्त्री
२७९