पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महिलांपर्यंत दासींकरवी पोहोचवावे असे लिहिले आहे. अधिकाऱ्याने स्त्रियांच्या तोंडाकडे पाहिल्यास कमी मजुरी दिल्यास त्याला दंड करण्याचे आदेश कौटिलीय अर्थशास्त्रात दिले आहेत. ही कला स्त्रियांनी गेल्या हजारो वर्षांपासून जपली आहे. 'वयन्ति ' म्हणजे सूत काढणारी स्त्री. या शब्दाला पुल्लिंग नाही. आजही हातमाग व्यवसायात स्त्रिया अधिक आहेत. दुर्वर्तनी स्त्रीपुरुषांना चाणक्याने दंड ठेवला परंतु पुरुषास स्त्रीपेक्षा दुप्पट दंड आहे. चाणक्याचे अर्थशास्त्र एका वर्गाच्या सोयीसाठी लिहिले गेले नाही. हा काळ इ.स. पू. तीसरे वा दुसरे शतक असावा. या काळातील भारतीय समाज एक छत्राखाली आला.
 न स्त्री स्वातंत्र्यमर्हति -
 यानंतरचा काळ मनुस्मृतीचा आहे. गणराज्यांच्या विघटनाबरोबरच मातृसत्ताक जीवन व्यवस्था मोडकळीस आली. तरीही स्त्रीचे आर्थिक व समाजिक स्थान पूर्णपणे दुय्यम झालेले नव्हते.त्यामुळे कौटिल्याने तिच्या अस्तित्वाचा विचार, तिच्या सामाजिक - कौटुंबिक आर्थिक प्रश्नांचा विचार माणुसकीच्या भूमिकेतून आणि समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून केला. परंतु नागरीकरण, मालमत्ता हक्क, कुंटुबव्यवस्थेचा विकासक्रम या वाटचालीत स्त्री - पवित्र्याच्या कल्पना तिच्या देहाभोवती केन्द्रित होऊन, अधिकाधिक कठोर झाल्या. तिची गणना 'शूद्रादिकांत' केले गेली. स्त्री मग कोणत्याही वर्णाची असो 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' हे सूत्र तिला लावले गेले.
 मानवाच्या कल्पनासृष्टीत त्याच्या अंतःसृष्टीचे प्रतिबिंब -
 भूमीच्या सुफलतेशी जोडलेल्या विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानतेचा शोध घेताना भारतातील मातृदेवता आणि मातृसत्ताक जीवनपद्धतीचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. विश्वाच्या मुळाशी असलेल्या आदितत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न मानवाने आपल्या हजारो वर्षांच्या अनुभवातून, निरीक्षणातून केला. त्याच्या अदितत्त्वासंबंधीच्या कल्पनासृष्टीत त्याच्या अंतःसृष्टीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. मानवी रूपातील जी दैवते मानवाने आदितत्त्वांसाठी कल्पिली त्यावरून मानवाच्या आत्मिक आणि सांस्कृतिक विकासाचा आलेख स्पष्ट होतो. दैवतविषयक कल्पनांचा उगम भौतिक वास्तवातून झालेला असतो. त्या दैवतांच्या साहाय्याने

२७८
भूमी आणि स्त्री