पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तऱ्हेची श्रद्धा आजही वन्य समाजात अस्तित्वात आहे. या श्रद्धेमागे दयाळू ईश्वराची कल्पना नसून मंत्रोच्चार आणि विशिष्ट कर्म यांतील परस्परानुबंधातून निर्माण होणाऱ्या यातुसमार्थ्याची कल्पना आहे. प्राचीन भारतातील मानवसमूह वनस्पती, पशुनामधारक होते. आजही ऋग्वेद संहितेतील उपलब्ध शाखांची नावे अश्वलायन, मंडुक, शाकल अशी आहेत. अथर्ववेद संहितेच्या काही शाखांची नावेही तैत्तिरीय (तित्तरपक्षी) श्वेताश्वतर (खेचर) मांडुक्य (बेडुक) अशी आहेत. ऋषींची नावेही काश्यप (कासव), कौशिक (घुबड), शुनक (कुत्रे) अशी आहेत. महाभारतात श्वान नावाच्या मानवसमूहाचा उल्लेख आहे. यावरून असे लक्षात येते की अतिप्राचीन मानवसमूहाची कुलनामे प्राणिसृष्टी आणि वनस्पती सृष्टीची होती. त्यामागचे रहस्य मानववंश शास्त्रज्ञांनी उलगडून दाखवले आहे. आजही कुललक्षण पूजा अस्तित्वात आहे. विदर्भातील गोंड, माडिया या आदिवासी जमातीत श्रद्धापूर्वक कुललक्षणाची पूजा केली जाते. कुळाचे संकटापासून रक्षण व्हावे, शेतीतून विपुल धान्य यावे यासाठी ही पूजा केली जाते. लोकायतिक, असुर चार्वाक यांचे विधी धर्मकल्पनेवर आधारित नसून ते यातुकल्पनेवर आधारलेले होते आणि वैदिक यज्ञाचे स्वरूपही यातुप्रधान होते. मॅकडोनल, ओल्डेनबर्ग या पंडितांनी वैदिक वाङ्मयातील टॉटेनिझमचे आस्तित्व मान्य केले आहे. टॉटेमिक समाजाचे जीवन सामूहिक होते. श्रेष्ठ कनिष्ठ ही स्थाने नव्हती. मॉरेट या समाजाचे वर्णन करतो..
 The True Totemic Society knows neither kings nor subjects. It is democratic and communistic all the members of the line is it on a footing of equality with respect to their totem.
 प्राथमिक अवस्थेतील मानवसमाज याच, साम्यवादी तत्त्वावर अधिष्ठित झालेला होता. प्राचीन भारतातील अनेक लोकसमूह, वैदिक आर्य समाजातील अनेक गण याच प्रकारचे सामूहिक जीवन जगत होते. ऊन, अन्न, पाऊस आदी कामनांसाठी सामूहिक कृती. मंत्रगान केले जाई. या समूहांच्या संकरातून समाज सतत विकसत राहिला.
 वर्गीय समाजाची घडण -
 समाजाच्या विकासक्रमात अनेक लोकसमूह एकमेकांत मिसळून गेले. तसेच

२७४
भूमी आणि स्त्री