पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नवस्वीकृतीची प्रक्रिया (Aglomeration) सुरू आहे. यातूनच भारतीय संस्कृतीची अभिजातता आणि एकात्मता दृढ आली आहे.
 या संस्कृतीला एकात्म करणाऱ्या साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य आदी परंपरांबरोबरच, लोकपंपरांनीही फार मोठे योगदान दिले आहे. भारतीय जनतेने, अनंतकाळ प्रचलित राहणाऱ्या विधी, उत्सव, सण, कथा, कहाण्या लोकगीते, लोकनृत्याचे पदन्यास आदींच्या द्वारे भारतीय संस्कृतीच्या विकासाचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. भूमीच्या सुफलनशक्तीशी निगडित विधिउत्सवांतून सतत जाणवणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचा शोध या प्रबंधातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाड्यातील लोकपरंपरा व महाराष्ट्रातील लोकपरंपरांचे, परप्रांतांतील या संदर्भातील लोकपरंपरांशी असलेले साम्य चकित करणारे आहे.
 धार्मिक विधीत स्त्रीची भूमिका 'मम' म्हणण्याची -
 व्रतवैकल्ये, विधी, उत्सव यांतच स्त्रियांचा सहभाग विशेष महत्त्वाचा असतो. होमहवनास महत्त्व असलेल्या धार्मिक विधीत मात्र पुरुष महत्त्वाचा असतो. स्त्रीची भूमिका पतीच्या हाताला हात लावून 'मम' म्हणण्यापुरती मर्यादित असते. स्त्री शेजारी असणे आवश्यक असले तरी, ती नसल्यास शेजारी सुपारी ठेवली तरी काम भागते. सुफलीकरणाशी संबंधित विधिउत्सवांत मात्र स्त्रियांचा सहभाग प्रत्यक्ष आणि महत्त्वाचा असतो. गुजरात-राजस्थानातील वा पंजाबातील हरियाली तीज असो वा कर्नाटक महाराष्ट्रातील हरितालिका-भाद्रपद तृतीया असो. या व्रतांत स्त्रियांचाच सहभाग असतो. तृतीया, षष्ठी या दिवसांना स्त्रियांच्या व्रतांत विशेष महत्त्व असल्याचे लक्षात येते. भूमीशी तिच्या सुफलनतेशी निगडित सणांत पुरुषांचा सहभाग नसतो. असल्यास नाममात्र असतो. या उत्सवांमधील 'स्त्रीप्रधानते' चा मागोवा आणि शोध या प्रकरणात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 व्रते, स्त्रियांचीच : त्यांचे मूळ कृषिप्रधान व्यवस्थेत -
 ज्येष्ठ आषाढातील वृक्षपूजा, श्रावण भाद्रपदातील नागपूजा, वारुळपूजा, जिवतीपूजा, गौरी -लक्ष्मीपूजा, आश्विन कार्तिकातील नवरात्र, दीपावली पूजा, मार्गशीर्ष पौषातील भूमीपूजा, सूर्यपूजा, माघ फाल्गुनातील स्थसप्तमी, होळी,

भूमी आणि स्त्री
२६९