यांची सविस्तर चर्चा या प्रकरणात केली आहे. त्यातून काही गोष्टी ठळकपणे जाणवतात त्या अशा -
१. भूमी आणि वर्षन यांच्या अनुबंधातून निर्माण झालेल्या विधी, उत्सवांमध्ये सामूहिकता आहे. ही व्रते निसर्गाच्या सान्निध्यात साजरी केली जातात. नृत्यात्मक हालचाली, फेरावरची गाणी, विविध खेळ (उदा. तव्यावरची फुगडी, सूप नाचवणे इ.) झोके, जागरण यांच्याशी हे विधिउत्सव जोडलेले आहेत .ती सामूहिकता भूमी, सूर्य यांच्यातील अनुबंधाशी जोडलेल्या विधी, उत्सवांतून नाही. हे विधीउत्सव सौभाग्य अखंड राहवे या भावनेशी जोडलेले आहेत. एकत्र येऊन विधी करण्यावर भर दिलेला नाही. येळाआवस हा पूर्णतः शेतात करावयाचा सुफलता विधी आहे. त्यामुळे त्यात रानात जाऊन स्वयंपाक करणे, सायंकाळी पूर्ण शेतास हेंडगा पेटवून प्रदक्षिणा घालणे. पांडवांची विशिष्ट पद्धतीने मांडणी करणे यांना महत्त्व आहे. त्यामुळे भूमीची सुफलशक्ती वाढते ही श्रद्धा आहे.त्यात विधींना विशेष महत्त्व आहे आणि ते शेकडो वर्षांपासून नियमबद्धतेने पाळले जातात.
२. पौषातले रविवार, रथसप्तमी, चैत्र तृतीया - अक्षय्य तृतीया या उत्सवांतील सामूहिकता जाऊन ती व्यक्तिनिष्ठ व्रते झाली. त्यांतील नियम व्यक्तीने पाळावेत या भूमिकेवर विशेष भर दिला जाऊ लागला.
३. पुरुष बीज स्वरूप आहे. त्याचे वीर्य तेजाचे प्रतीक मानले जाऊ लागले. जीवन जगण्याच्या रीतीत पुरुषप्रधानता आली. स्त्री क्षेत्र स्वरूपा - स्थिर मानली गेली. अग्नी, तेज, पर्जन्य या सर्वांना तिने स्वतःत रिचवून घ्यावे. यातून सहनशीलता हा तिचा 'गुण' मानला गेला. तिचे अस्तित्व 'बीज' पेरणाऱ्याशी, तेज देणाऱ्याशी बांधले गेले. तो असेल तरच तिला असण्याचा अधिकार राहिला. सर्व व्रतांतील निसर्गाशी असलेला अनुबंध लोप पावून पतीच्या असण्याशी पर्यायाने स्त्रीच्या सौभाग्याशी जोडला गेला.
४. कालौघात कुमारी स्त्री 'सौभाग्यकांक्षिणी' झाली. एकूणच व्रते-वर्षन आणि सूर्य या दोनही प्रेरकांशी जोडलेल्या व्रतांना, कुमारिकांची असतील त्यांना, 'चांगला
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६६
भूमी आणि स्त्री