Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चूल, केळी (मातीची कळशी) या वस्तू वाणी, माळी, सुतार, सोनार, कुंभार यांच्याकडून वाजतगाजत आणतात. बिजोरा हे फळ आवश्यक असते. हा उत्सव मुळात भूमीच्या सुफलन शक्तीशी जोडलेला आहे. 'लोकदेवता कानबाई' हा डॉ. प्रा, पुष्पलता करनकाळ यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी मुळांतून पाहावा. 'सरस्वती शब्द कोश' भाग १ मध्ये बिजोराचा अर्थ बिजवराशी विवाह असा होतो. आठ विवाह प्रकारांपैकी दैवविवाहात कन्येस पतीचे भाग्य निरंतर लाभावे म्हणून प्रथम प्रतीकात्मक देवा ब्राह्मणांशी लग्न लावले जाई. नंतरच नियोजित वराशी विवाह लावला जाई. या रुढीला अनुसरुन बिजवर ब्राह्मणाचे प्रतीक म्हणून या विधीत 'बिजोरा' फळ आवश्यक असते.
 दिवा : अग्नी सूर्यपूजेचे प्रतीक -
 हे फळ घेण्यासाठी वाजत, मिरवत माळ्याच्या मळ्यात जातात. त्या फळाची पूजा करून आंब्याच्या झाडाखाली गारगोटीच्या खड्यांत कापूस ठेवून ठिणगीच्या साहाय्याने दीपज्योत पेटवितात. आंब्याच्या, बीजोराच्या२६ झाडाखालची काळी माती, बीजोरा व दीपज्योत वाजतगाजत घरी आणतात. दिवा, सव्वा महिना घरात तेवत ठेवतात. त्यासाठी फक्त एरंडेल तेलच वापरतात. दीपपूजा ही सूर्यपूजेचे, आग्निपूजेचे प्रतीक आहे. दुपारी नदी वा विहिरीवरून वाजत गाजत पाणी आणतात. कानबाईच्या विधीत 'सव्वा' चे महत्त्व असते. सव्वा हे 'वाढी' चे प्रतीक आहे. चौरंगावर सव्वा पावशेर गहू पसरवून त्यावर कानबाईचा मुखवटा मांडतात. भोवती सात मूठी तांदूळ वेगवेगळे ढीग करून ठेवतात. मुखवट्याशेजारी तांब्या ठेवतात. त्यात तांदूळ टाकतात व त्यावर परणून आणलेला नारळ ठेवतात. नारळ ठेवलेल्या कलशाला दागिने घालतात. नारळाच्या मध्यात नथ खोचतात. नारळावर लाल खण पांघरतात. कळशीच्या बाजूला कन्हेर या वनस्पतीची फांदी रोवतात. कलशासमोर बिजोरा हे फळ टांगते ठेवतात, रांगोळीने चौरंग सुशोभित करतात. १०८ प्रकारच्या फुलापानांची आरास करतात. विविध फळे, अंजीर, मनुका आदी सुकामेवा, काळे तीळ, काळी पोत, काळा हरभरा, टिकली, बांगडी या वस्तू पूजेत ठेवतात. चौरंगाभोवती आंब्याचे तोरण बांधतात.

२६४
भूमी आणि स्त्री