Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतिपदेस) गणगौर बसते. या दिवशी होळीच्या राखेचे १६ मुटके करतात, शेणाचे १६ मुटके करतात. भिंतीला १६ हळदीचे आणि १६ कुंकवाचे टिकल्या, ठिपके काढतात. या ठिपक्यांच्या खाली राख व शेणाचे १६ मुटके मांडतात. हे मुटके गौरीचे प्रतीक. पहिल्या दिवशी या गौरीची पूजा गव्हाच्या ओंब्यांनीच करतात. दुसऱ्या दिवशी हळदीने पूजा करतात. सातव्या दिवशी काजळाचे १६ ठिपके भिंतीवर काढतात. त्याच दिवशी २ कुंड्या वा मडकी चुना व कावेने रंगवून त्यात गहू, साळ, सरकी, ज्वारी, हरभरा, तूर, जवस आदि ७ प्रकारची धान्ये पेरतात. दुसऱ्या दिवशी ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्याजवळ ते कणीस ठेवतात. त्याला शंकर म्हणतात. दुसऱ्या कणसाला केसाचा गुंता आणि मोळी (लाल पिवळ्या रंगाच्या दोऱ्याला मोळी म्हणतात) बांधतात. ती पूजेत आवश्यकच असते. ती शुभकारक असते, तिला गौर म्हणतात. ७ व्या दिवशी पाटावर गहू टाकून त्यावर कुंड्या ठेवतात. त्यांची रोज पूजा होते. जवळच्या विहिरीवर जाऊन मिरवत कळशीने पाणी आणतात. ते कुंड्यात टाकतात. या गौरीला चुर्म्याचा नैवेद्य लागतो. अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी शंकर गौरीला घ्यायला येतो. या दिवशी सर्व जणी सामूहिकपणे विहिरीवर जातात. दोन घागरीत पाणी आणतात. एक कळशी शिव तर दुसरी गौरी. त्यांचा विवाह लागतो. सात फेरे होतात. मग या कळशा कुंड्यांपाशी ठेवतात. तृतीयेला म्हणजेच महाराष्ट्रात ज्या दिवशी गौर माहेरी येते. त्या दिवशी, गणगौरीचे विसर्जन होते. पिठात गूळ घालून १६ फळ, त्रिकोणी अकाराचे छोटे छोटे मुटके तळतात. कंगवा, डबी अशी शृंगारसाधने या पिठाची करून ती तळतात. ती तळलेल्या डबीत ठेवतात. या डबीत ८ फळे ठेवतात. डबी बंद करतात. या दिवशी जेवणात हिरवी भाजी लागतेच. राजस्थानात, महाराष्ट्रातील खेड्यांत मेथी, हरभऱ्याची हिरवी भाजी वाळवून ठेवण्याची प्रथा आहे. मुलीच्या विवाहानंतर या व्रताचे उद्यापन

२५६
भूमी आणि स्त्री