Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांचा समन्वय संस्कृतीच्या विकासात घातला गेला. कारण मानवाचे जगणे अग्नीमुळे सुखकर झाले. अग्नी सान्निध्यात अपत्य निर्मितीही चांगली होते हे आदिमानवाच्या लक्षात आले. भूमी सुफलित करायची तर स्त्री-पुरुष समागमाची कृती नक्कल म्हणून करावी. पुनःपुन्हा जाणीवपूर्वक केलेल्या या कृतीला मग विधी रूप येते. हे विधी प्रतीकात्म होतात. प्रत्यक्ष स्त्री-पुरुष संयोग झाला नाही तरी तद्वाचक२२ शब्दं त्यानिमित्ताने उच्चारले जातात. कारण कृतीप्रमाणे त्या शब्दातही सामर्थ्य असते. जे भूमीच्या सुफलीकरणास साहाय्यभूत ठरते.
 होळी वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी असते. वसंतात सृष्टी विविधरंगी, फुलांच्या बहराने बहरून जाते. झाडे कोवळ्या पालवीने झुलू लागतात. जणु या पुननिर्मितीच्या काळासाठी, सुफलीकरणास पोषक ठरणाऱ्या शिव्या... अश्लील शिव्या लाभदायक असतात ही भूमिका होळी उत्सवाच्या...रंगोत्सवाच्या पाठी असते. अग्नीच्या साक्षीने होणाऱ्या या सुफलीकरण विधीची स्पष्टीकरणे डॉ. देवीप्रसाद चटोपाध्याय, डी. डी. कोसंबी, फ्रेजर मॅलिनोव्हस्की आदी पौर्वात्य व पाश्चिमात्य समाज - मानव शास्त्रज्ञांनी दिली आहेत.
 होळी हा विधी प्रागैतिहास काळात स्त्रीने करावयाचा स्त्रीप्रधान विधी असल्याचे डॉ.डी.डी. कोसंबींनी आपल्या 'कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ अनशंट इंडिया' या ग्रंथात नोंदविले आहे आणि त्यात काही नवल नाही. शेतीचा शोध स्त्रीने लावला. शेतीशी निगडित विधींत स्त्रीप्रधानता आहेच.आदिम काळात या विधींचे पौरोहित्य स्त्रीकडे असे. आज पुरुषप्रधान समाजात या विधींचे पौरोहित्य पुरुषांकडे आले तरी अनेक विधींत पुरुष स्त्रीवेश धारण करून ते विधी करतो.
 पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा बसताना कृष्णानेच राधारूप घेतले अशी स्पष्टीकरणात्मक कथा - मिथ् - निर्माण झाली. होळी उत्सवात उत्तरेत स्त्रिया उन्मुक्तपणे सहभागी होतात. या काळात गायली जाणारी गाणी विप्रलंभशृंगाराची असतात. राधा ही स्त्रीतत्त्वाची प्रतिनिधी असते तर श्रीकृष्ण पुरुषतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. डॉ. तारा भवाळकर नोंदवितात. 'नितांत शृंगारिक, क्वचित् अश्लीलतेच्या पातळीवर पोहोचणारी ही गीते अदिम सुफलीकरण विधीतील आज अश्लाघ्य समजल्या जाणाऱ्या उच्चारांचा उत्तरकालीन आविष्कार आहेत.'

भूमी आणि स्त्री
२५३