पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वसंतऋतुचा पहिला महिना आणि कामदेवाचा प्रिय मित्र मानले आहे. पौषानंतर येतो माघ आणि माघानंतर फाल्गुन. 'अश्वत्थाची पाने' या ग्रंथात डॉ. स. अ. डांगे नोंदवतात, 'मकरसंक्राती हल्ली जरी पौषात येत असली तरी पूर्वी ती माघ महिन्याच्या अमावास्येस पडत असे (कौषितकी ब्रा. १९.३) दुसऱ्या गणनेनुसार ती फाल्गुनात येई (तैत्तिरीय सं. ७.४.८.१.२) फाल्गुनातील पूर्णचंद्र, वर्षाचे मुख मानला जाई... घटात वाण देण्याची प्रथा सूचक अशी आहे. तेव्हा 'घटे अर्कः' म्हणजे 'सूर्याचे पृथ्वीच्या घटयोनीतील बीजारोपण' हे समीकरण निश्चित झाले. हा काळ वर्षातील अत्यन्त महत्त्वाचा काळ मानला जाई. हा काळ सूर्याचे बीज पृथ्वीत येण्याचा काळ. बीजारोपणाचा काळ. जमीन भाजली की तिच्यातली उर्वराशक्ती, सुफलनशक्ती वाढते अशी आजही शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. (डॉ.स. अं. डांगेंनी 'होलाष्टकोपनिषद' या हस्तलिखिताचा परिचय करून देण्याच्या निमित्ताने लेख लिहिला होता.)
 धुळवडीमागील भूमिका -
 या हस्तलिखितात होळीच्या दुसऱ्या दिवशी चौरस्त्यावर जाऊन शिव्या देणे, विचित्र पोषाख केलेल्या माणसाला गाढवावर बसवून, त्याचे तोंड काळे करून धिंड काढणे असे प्रकार केले जातात असे लिहिले आहे. त्यामागे जमिनीच्या सुपीकतेला मारक ठरणाऱ्या दृष्ट देवतांना दूर सारण्याची कल्पना आहे. सूर्यबीज धारण करताना पृथ्वीची सुपीकता वाढावी हा हेतू आहे. हे होत असताना इडापिडा टळावी या भूमिकेतून शिव्या देणे, धिंड काढणे आदी प्रकार केले जातात. 'कुम्भ' राशीत सूर्य प्रवेश करतो तो काळ बीजरोपणाचा असून या तत्त्वाचा व्याप अश्वमेघापासून ते होलिका उत्सवापर्यन्त आहे असे डॉ. स. अं. डांगे२१ आवर्जून नोंदवतात.
 होळीची राख आणि बीजातील सुफलता -
 होळी शेणाच्या गोवऱ्या, लाकडे यांची पेटविली जाते. होळीची राख अत्यन्त सुफल असते. होळीची राख टोपली भरुन आणायची आणि तिच्यात चांगली कणसे विविध प्रकारच्या भाज्या, भोपळे यांच्या बिया काढून घोळसायच्या आणि त्या मडक्यात घालून ठेवायच्या. उरलेली राख मातीत मिसळून आळी तयार करून ठेवायची. सुमारे दीड महिन्यांनी अक्षय्यतृतीयेस या बिया अंगणात, परसात टोचतात.

भूमी आणि स्त्री
२५१