Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अशी अनेक मुरळी गीते जी लावणीचा बाज .. लावणीचे वळण दाखवणारी आहेत. या ठिकाणी एक बाब लक्षात येते की, 'गवळणी' चा बाज आणि ठेका मुरळी गीतांसारखा आहे. या लोकपरंपरांशी जोडलेल्या गाण्यांचा कलात्मक आविष्कार 'लावणी'त परिष्कृत झाला. या ठिकाणी दुर्गा भागवतांचे विधान आठवते, लावणी नृत्य हे मुळातले पेरणीपूर्वीचे नृत्य आहे. मुरळ्या मोकळ्या आकाशाखाली अंगणात नाचून 'जागरण' गाजवतात. भूमीची सुफलनशक्ती वाढावी, योग्य प्रमाणात वेळेवर पर्जन्यदृष्टी पडावी यासाठी स्त्रियांनी शेतात, जमिनीवर नृत्य करावे ही विधी-संबद्ध कल्पना वेदपूर्वकाळपासून प्रचलित आहे. खंडोबाचे नवरात्र जमिनीची सुफलता वाढावी यासाठी असते. 'महाराष्ट्र दैवत श्रीखंडोबा'१३ या राजाराम हरी गायकवाड, बेनाडीकर यांच्या पुस्तकात श्री. ग. ह. खरे यांच्या 'महाराष्ट्राची चार दैवते' पुस्तकातील मत नोंदवले आहे. ते लिहितात, 'खंडोबाची नावे तपासली तर याच्या कल्पनेत शिव, त्याचे एकरूप भैरव आणि सूर्य या तीन देवांचे मिश्रण झाल्याचे प्रतीत होते.'
 'मैलार' या खंडोबाच्या नावाबद्दल राजाराम हरी गायकवाड नोंदवतात, 'म' म्हणजे शिव - शुंभु, 'र' म्हणजे विष्णु आणि 'इला ' म्हणजे पृथ्वी (माती) तेव्हापासून त्याच्या मृण्मय मूर्तीला 'मैलार' म्हणतात. 'र' चा 'ळ' होऊन मैराळ म्हणतात.
 श्री. बी. ए. गुप्ते लिहितात, 'मार्तंड हे सूर्याच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. सूर्य हा प्रचंड प्रकाशपुंज आहे.' त्यामुळे ज्या शिवाने खंडोबाला शक्ती दिली, आणि शिव ही विध्वंसक देवता आहे. त्या शिवाचा खंडोबा अवतार आहे असे समजून घेणे कठीण आहे. खंडोबा हा साथींपासून लोकांचे रक्षण करणारा आहे. त्यामुळे ही गोष्ट एक 'सूर्य चमत्कार' आहे असे सुचविण्यात आले आहे.
 भारतीय संस्कृतीच्या इतिहासात अनेक निसर्ग देवता, पूर्व वैदिक देवता, लोकदेवता यांच्या समन्वयातून विविध देवतांची नवी रूपे 'सिद्ध' झाली. या प्रक्रियेतून शिव, स्कंद सूर्य, इंद्र, विष्णु यांच्या प्रभावातून सिद्ध झालेली ही लोकदेवता महाराष्ट्रातील सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांतून 'कुळाचार' केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या देवतांत समाविष्ट झाली असावी असे वाटते.

भूमी आणि स्त्री
२३९