पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पशुपालन करणाऱ्या धनगरांची, कोळी समाजाची ही देवता आहे. ही देवता शिवाचेच एकरूप आहे असे म्हटले जाते. जेजुरीचा खंडोबा शंकराचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय ऊर्फ स्कंद याचे रूप आहे असे मानले जाते. स्कंधाचे अपभ्रंश रूप खंडोबा असे वि. का. राजवाडे म्हणतात. हा ११ देवांचा सेनापती होता. त्यामुळे तो 'वीरदेव' आहे. महाराष्ट्रातील खंडोबा तामिळनाडूतील सुब्रह्मण्याचा'१० अवतार आहे असेही मानले जाते. खंडोबाच्या देवळात नंदी, घोडा, कुत्रा यांना महत्त्व असते. खंडोबाला तीन बायका आहेत. म्हाळसा ही प्रथम पत्नी. ती वाणी समाजाची आहे. बानू ऊर्फ बाणाई ही धनगर कन्या आहे तर पालाई ही गवळण आहे. या दैवताची भक्ती आंध्र, कर्नाटक, तामिळनाडूत काही प्रमाणावर चालते. खंडोबाची तांदाळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तीनही रूपांत पूजा होते.
 वाघ्या व मुरळी -
 या देवाच्या नावाने भीक मागतात. या भीक मागण्याला 'मल्लुखानाची गदा' असा पारिभाषिक शब्द आहे. हा शब्द मुस्लिम आहे. भक्त देवासमोर जातांना घोंगडीची कफनी, गळ्यात कवड्यांची माळ, हातात पोत घेऊन देवासमोर नाचत भंडारा उधळतात, कुत्र्याप्रमाणे भुंकतात. चांगभले - येळकोट - एळकोट मल्हार असा घोष करतात. विवाह, जावळ काढणे या निमित्ताने जागरण केले जाते. रात्री वाध्या मुरळी नाचून गाणी म्हणतात.
 वाघ्याच्या गळ्यात व्याघ्रचर्माची भंडाऱ्याने भरलेली पिशवी अडकवलेली असते, खांद्यावर घोंगडी टाकलेली असते हातात घोळ (लहान घंट्यांचा जोड) असतो. गाणी म्हणताना घोळ मुरळीच्या हातात असतो. ती पिवळ्या रंगाचे नऊवारी पातळ नेसते. कपाळाला हळद माखलेली असते. गाताना एका हाताने घोळ वाजवीत ती गिरक्या घेत विशिष्ट पद्धतीने नृत्य करते. वाघ्या तुणतुणे वाजवीत गाणी म्हणतो. दुसरा खंजिरीवर गाण्याला साथ देतो. अनेक घरांत हा कुळाचार नेमाने पार पाडतात.
 देवाला वाहिलेले मूल गुरवाच्या द्वारे भंडारा उधळून, मुलाच्या गळ्यात भंडाऱ्याची पिशवी बांधून वाहिले जाते. महार, मांग, कुणबी आदी समाजात मुले, मुली वाहण्याची प्रथा होती. माझ्या परिचयाच्या व्यक्तीचे काका खंडोबाचे भक्त

भूमी आणि स्त्री
२३७