Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

घेना गायल्यारे आप धरातरी देवा ऽऽ
घेना गायल्यारे आप धरातरे ऽऽ
घेना गायल्यारे आप कणसरी देवा ऽऽ
घेना गायल्यारे आप कणसरे ss

 महाराष्ट्रातील आदिवासींचे सण भाद्रपद आणि चैत्रात येतात. ते सुफलीकरणाशी जोडलेले असतात. त्या संदर्भात आवश्यकतेनुसार विवेचन पुढे येईलच. भारतातील 'हो' आदिवासी शेतीच्या सुफलीकरणाशी जोडलेले सात धार्मिक सण पाळतात. संथाळांतील हरियारसिम् हा सण याच हेतूने साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातील भुंइया, कोल, भिंड हे आदिवासी बैगा जातीच्या उपाध्यांकडून शेतीच्या सुफलीकरणाचे विधी करून घेतात. आदिम काळात निसर्गातील विविध चमत्कारांची आव्हाने सामूहिक आराधनेतून स्वीकारली गेली. उदा. - पावसाचे धुवाँधार कोसळणे. पाऊस न पडल्याने पडणारा दुष्काळ, जीव घेणारी तुफानी वादळे असे अनेक निसर्गातील चमत्कार. त्यांचे निराकरण सामूहिक आराधनेतून करण्याचा पायंडा पडला.लौकिक जीवनात या यातुविधींना महत्त्वाचे स्थान होते. त्यात ईश्वर या संकल्पनेला स्थान नव्हते. तर सामूहिक श्रमातून तत्संबंधी विधी करणे व अधकिाधिक फलाची आशा करणे हा यातुविधीमागचा हेतू असे.
  "Enacting in fantacy the fulfillment of the desired reality"
 इष्ट कामनेचे कल्पना सृष्टीत साक्षातीकरण करून, फळ मिळविण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करणे हे यातुविधींमागील तत्त्व होते. 'सामूहिक कर्म' हे दुसरे तत्त्व. सामूहिक कर्मातून निर्माण होणारा भावनात्मक आवेग यात्वात्मक विधीच्या यशस्वितेमागे असावा. आजही आदिवासी समाजात 'सामूहिक कर्मा' चे अस्तित्त्व आहे. यातुविधींना सुफलीकरण विधींचे रूप प्राप्त झाले ते याच काळात. कुमारिका वा पुत्रवती स्त्रीकडून पेरणी करून घेणे वा झाडे लावून घेणे. पाऊस पडावा यासाठी रात्री शेतात जाऊन नग्न होऊन नृत्य करणे आदी रिवाजांतून अनेक बाबी लक्षात येतात. प्रथमावस्थेतील मानवाने स्त्री आणि भूमी यांच्यातील साधर्म्य आणि साहचर्य याबाबत केलेल्या निरीक्षणाचा अंदाज यावर्षानुवर्षे चालत आलेल्या लोकपरंपरांतून आपल्याला येतो.

भूमी आणि स्त्री
१९