Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या काळातील महत्त्वाचे विधी, व्रते, सण, उत्सव आणि तत्संबंधी गाण्यांचा विचार या प्रकरणात केला आहे.
 महत्त्वाचे विधी, व्रते, सण, उत्सव -
 १.खंडोबा ऊर्फ मार्तंडभैरवाचा षड्रसोत्सव, २.नागदिवे पूजन, ३.पौषी रविवारी केली जाणारी आदित्य राणूबाईची पूजा, ४. संक्रान्त, ५. रथसप्तमी - रथाधिष्ठित सूर्यपूजा, ६. होळी, ७. वसंत पंचमी, ८.रंगपंचमी, ९, इळा आवस, १०. शाकंभरी देवीचे नवरात्र - पौषी पौर्णिमेस समाप्ती, ११. चैत्री तृतीया - गौर मांडणी, १२. अक्षय्यतृतीया, १३. कानबाईची पूजा.
 सूर्योपासनेची प्राचीन परंपरा -
 या विधी-व्रतांचा मागोवा घेण्यापूर्वी या काळातील मुख्य देवता 'सूर्य' हिचा सांस्कृतिक प्रवास पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, भूमी आणि सूर्य यांच्यातील नात्याबाबत लोकमनात आणि लोक परंपरात असलेल्या प्रतिमा, संकल्पना, पाहाव्या लागतील.
 सूर्य या देवतेची उपासना प्राचीन काळापासून भारतात केली जाते. ऋग्वेदात सूर्याची अनेक सूक्ते आहेत. सूर्योपासना हे वैदिकांचे नित्यकर्म होते. पुराणातील सप्तमी व्रते सूर्याचीच आहेत. त्यातही माघ शुद्ध सप्तमी, रथसप्तमी अत्यंत महत्त्वाची. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जमीन भाजून निघते. तिच्यातील सुफलनशक्ती आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता त्यामुळे वाढते. याची जाण कृषिजीवी समाजाला होती.
 वेदकाळात कृषीचा विकास : नांगराचा उपयोग -
 ऋग्वेदाचा अंतकाळ आणि यजुर्वेदकाळ यात शेतीची प्रगती होऊ लागली. अर्थववेद काळात तिचा विकास झाला. वर्षाऋतूत पेरलेले धान्य हिवाळ्यात हाती येते. तर हिवाळ्यात पेरलेले यव उन्हाळ्यात हाती येतात असे सांगणारे संदर्भ ब्राह्मणग्रंथात मिळतात. शतपथ ब्राह्मणात नांगरणी पेरणी, कापणी, झोडपणी या शेतीच्या क्रियांचे वर्णन केलेले आहे.
 " हे राजा, हे राज्य तुला शेतीकरिता (ऋश्चै), सर्वांच्या हिताकरिता (क्षेमाय), पोषणाकरिता (पोषाय) दिले आहे. कारण अन्न म्हणजे कृषि (अन्नम् वै कृषिः)"

भूमी आणि स्त्री
२२७