पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामर्थ्य ईश्वर कल्पनेवर अधिष्ठित असते तर व्रतांचे सामर्थ्य हे यात्वात्मक असते. या संदर्भात अवनीन्द्रनाथ नोंदवितात -
 The desires of male and desires of female - the vedic Rituals of male and Vratas of the women - that is all the difference of the two.
 वैदिक आर्यांचे सामगानयुक्त विधी पुरुषप्रधान आहेत. तर बहुतेक व्रते स्त्रियांनी आचारावयाची असतात. व्रते वेदकालाइतकी प्राचीन असली तरी त्यांचा उगम वैदिक वाङ्मयात आढळत नाही. वैदिक संस्कृतीहून भिन्न अशा लोकसंस्कृतीचे अंतरंग व्रताचरणात प्रतिबिंबित झालेले दिसते.
 भारतातील आदिकालीन संस्कृती शिकारीशी आणि शेतीशी निगडित असल्याने प्राथमिक अवस्थेतील कृषिजीवी समाजात भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जन करण्याच्या सामर्थ्याविषयी विलक्षण आकर्षण होते आणि या गूढाबद्दल सुप्त भयही होते. स्त्री हे विश्वनिर्मितीचे केन्द्र असून सर्जन करण्याची अलौकिक यातुशक्ती तिच्यातच असते अशी त्यांची धारणा होती. भूमीतून निर्माण होणाऱ्या धान्य व वनस्पतींच्या सर्जनाची प्रक्रिया मंत्रतंत्राच्या आणि सामूहिक विधीच्या सामर्थ्यावर अवलंबून असते असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यातूनच भूमीच्या सुफलीकरणाचे विविध तांत्रिक विधी निर्माण झाले.
 शहरी आणि यांत्रिक जीवनापासून दूर असलेल्या आदिवासींच्या उत्सवांचा शोध घेतल्यास वरील विधानातील सत्यता आजमावता येईल.
 आदिवासींच्या देवता : धरती आणि कणसरी -
 आजही आदिवासींच्या उत्सवांचा शोध घेतला असता लक्षात येते की, ते मूलतः सुफलीकरणाशी जोडलेले असतात. कंदमुळे, धान्य देऊन आपली उपजीविका करण्यास मदत करणाऱ्या भूमीबद्दल आणि धान्याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची पवित्र भावना असते. धरित्री आणि कणसरी म्हणजे धान्य देवता यांची उपासना बहुतेक आदिवासी जमातीत करतात. नारनदेव म्हणजे पाऊस देव त्याची प्रार्थना करतात. त्यावेळी म्हटले जाणारे नृत्यमय गीत -

१८
भूमी आणि स्त्री