पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाषा द्रविड भाषावंशातील असल्याने त्यांच्यात आंतरिक साम्य आहे. उत्तरेतील राजस्थानी, गुजराती, हिंदी, बंगाली, बिहारी, काश्मीरी, मराठी, उडिया, पंजाबी या भाषा एका भाषावंशातील आहेत. त्यांच्यातही आंतरिक साम्य आहे. या दोन भागांच्या मध्यावर, या दोहोंना जोडणारा महाराष्ट्र आहे.
 आसाम, अरुणाचल, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, उदयाचल ही सात पूर्वेकडील अति लहान राज्ये. यांनाच 'सात बहिणी' 'सेव्हन सिस्टर्स' म्हटले जाते. यांतील आसाम व त्रिपुरा या राज्यांत बंगाली लोक फार पूर्वी गेले, त्यामुळे या दोन राज्यांच्या नागर भागात बंगाली भाषा बोलली जाते. मात्र डोंगर भागातील आदिवासी आपापली भाषा बोलतात. मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल, उदयाचल हे भाग डोंगरांचे, घनदाट झाडीचे, परस्पर संवादासाठी रस्ते नाहीत. कोणतीही विज्ञानसाधने नाहीत. प्रत्येक लोकवस्तीची भाषा वेगळी हा अपवाद सोडला तर उत्तरेत व दक्षिणेत एकेका भाषावंशातील भाषा नांदतात. दोहोंच्या मध्यावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील कर्नाटक, आंध्राच्या जवळच्या भागावर दाक्षिणात्य परंपरांचा प्रभाव आहे. तर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांताजवळील जिल्ह्यांवर उत्तरेतील लोकपरंपरांचा प्रभाव आहे.
 महाराष्ट्रावर दक्षिणेतील आंध्र, कर्नाटक, तामिळ संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. केवळ या प्रांतातील तेलगु, कानडी, तामिळ भाषांतील अनेक शब्द, त्यांची रूपे मराठीने उचलली आहेत असे नाही, तर त्यांच्या भाषिक विशेषांमध्येही साम्य आहे. महाराष्ट्रातील अनेक संप्रदाय व देवता कर्नाटकातून आल्या आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सांस्कृतिक अनुबंधाविषयी 'मऱ्हाटी संस्कृती: काही समस्या' या ग्रंथात शं. वा. जोशी यांनी विस्ताराने चर्चा केली आहे. तामिळ आणि मराठी यांच्या परस्पर संबंधांची चर्चा करताना, त्याचप्रमाणे, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंधाची मीमांसा करताना श्री. विश्वनाथ खैरे यांची 'तामिळ महाराष्ट्र' व 'अडगुल मडगुल' ही २ पुस्तके दक्षिण भारतातील निरनिराळ्या भाषांचा परस्परांवर प्रभाव कसा पडला आहे, हे जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जिज्ञासूंनी ती मुळातून पाहावीत असे सुचवावेसे वाटते.
 "आंध्र- महाराष्ट्र सांस्कृतिक अनुबंध' या डॉ. ताराबाई परांजपेंनी लिहिलेल्या

२२४
भूमी आणि स्त्री